आक्रमक फर्नांडो टोरेसच्या डोक्‍याला जबर दुखापत

0

माद्रिद – ला लिगा स्पॅनिश फुटबॉल साखळीतील लढतीत खेळताना ऍटलेटिको माद्रिदचा अव्वल आक्रमक फर्नांडो टोरेसच्या डोक्‍याला जबर दुखापत झाली; पण त्याच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नसल्याने त्याला तपासणीनंतर हॉस्पिटलमधून पाठवण्यात आले आहे. ऍटलेटिको आणि देपोर्तोवा लढत 1-1 बरोबरीत होती. लढतीतील शेवटची पाच मिनिटे शिल्लक होती. त्या वेळी हवेतून आलेल्या चेंडूवर ताबा घेण्यासाठी टोरेस सरसावला; पण पाठीमागून येणाऱ्या देपोर्तोवाच्या ऍलेक्‍स बेर्गतिनोस याचा त्याला धक्का लागला आणि तो खाली पडला. तो बेशुद्ध होता.

मैदानावरच त्याच्यावर उपचार करण्यात आले; मात्र लगेचच त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. ऍटलेटिकोने या दुर्घटनेपूर्वीच तीन खेळाडू बदलले होते, त्यामुळे त्यांना अखेरची काही मिनिटे दहा खेळाडूंविनाच खेळावे लागले; मात्र निकाल बदलला नाही. ऍटलेटिकोचे खेळाडू या वेळी केवळ सामना संपण्याची औपचारिकता पूर्ण करीत होते. टोरेसचा सहकारी जोस मारिया गिमेनेझ याला तर अश्रू आवरत नव्हते. काय होणार याची आम्हाला सर्वांना धास्ती वाटत आहे, असे ऍटलेटिकोचे लेफ्ट बॅक फिलीप लुईस याने सांगितले. टोरेसच्या दुखापतीचे स्कॅन करण्यात आले. त्याला कोणतीही गंभीर दुखापत नाही. त्याला 48 तास विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असे ऍटलेटिको संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.