आकुर्डीतील नोकरी महोत्सवाला उमेदवारांचा उदंड प्रतिसाद

0

पिंपरी-चिंचवड : विश्व श्रीराम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शेकडो युवक-युवतींनी नोकरीच्या संधीसाठी सहभाग नोंदवला. त्यापैकी पात्र उच्चशिक्षित, अल्पशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपन्यांतर्फे मुलाखतीचे पत्र देण्यात आले. आकुर्डी, विठ्ठलवाडी येथे आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता, आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे, सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे सुभाष माचरे, संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, विश्व श्रीराम सेना आरोग्य मंच अध्यक्ष अक्रम शेख आदींसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

600 युवक-युवतींना संधी
या रोजगार महोत्सवात अल्पशिक्षित व उच्चशिक्षित अशा 600 हून जास्त बेरोजगार युवक-युवतींना महिंद्रा लॉजिस्टिक्स, टाटा टेलिसर्व्हिसेस प्रा.लि., वायएसएफ प्रा.लि., यशस्वी ग्रुप, अ‍ॅडोको इंडिया, इन्स्पायर प्रा.लि., टाटा बिजनेस सर्व्हिसेस, मिन्डा, कंट्री क्लब प्रा.लि., वेब इट सोलूशन्स, हायटेक सोलूशन्स, जिनियस प्रा.लि., युरेका फोर्ब्स्, सिद्धेश्वर प्रा.लि., अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या मुलाखतीचे पत्र देण्यात आले. नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी महोत्सवात उपस्थित होते.