आई-वडिलांच्या आर्शिवादानेच होते वाढ

0

फैजपुर : आई हिच देवा घरची माता आहे. म्हणून आपल्या बाळाला काय झाले व पाहिजे काय ही तीच आई ओळखू शकते. आई वडिल हे आपले एक मजबूत खोड आहे, आणि त्याच मजबुतीवर आपली वाढ होत असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले. मधुर संस्कार केंद्राच्या वतीने सानेगुरुजी जयंती निमित्त तेरावा मातृवंदना कार्यक्रमाचे आयोजन सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट निष्कलंक धाम, वढोदे येथे करण्यात आले होते.

केंद्राने जोपासला ’मानवधर्म’
सकाळी सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री अभ्यास केंद्र उमविच्या डॉ शोभा शिंदे, श्रमपूर्ती आदर्श माता सिंधुताई सपकाळे व मधुर संस्कार केंद्राचे प्रमुख पी.आर. पाटील होते. जनार्दन महाराजांनी आशिर्वचानत सांगितले की, मधुर संस्कार केंद्राने कोणतीही जात, पाथ व धर्म यांच्या पलीकडे जावून ’मानवधर्म’ जोपासला आहे. संवेदना जागृत ठेवून या भारत देशाला अशा मधुकर संस्कार केंद्राची गरज आहे. जात, धर्म सर्व बाजूला ठेवून सर्व धर्मातील सर्व जातीतील मातांचा सन्मान मधुर संस्कार केंद्र तेरा वर्षापासून करत आहे. खरोकर कौतुकास पात्र आहे. डॉ. शोभा शिंदे यांनी सांगितले की, साने गुरुजींचे विचार घेवुन तरुण मुलांनी पुढे जायचे, आई वडिलांना मुलांनी दुखवू नये, घरात लहान मुलांचे हात धरायला आजी आजोबा नसतील तर ते घर काही उपयोगाचे नाही. या मातृवंदना कार्यक्रमला मला बोलावून हे माझ भाग्यच असल्याचे स्पष्ट केले.

2004 पासून मातृवंदन
प्रा. व.पु. होले यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले की, मधुर संस्कार केंद्राची स्थापना पी.आर. पाटील यांनी 2004 साली केली. त्यांनी आपल्या पगारातील 10 टक्के रक्कम बाजूला काढून गरीब आदिवासी मुलांसाठी खर्च करत होते. प्रत्येक सण-उत्सव पाटील हे त्यांच्या सोबत साजरे करीत होते. पाटील हे दोन वर्षाचे असतांना त्यांची आई मरण पावली. ज्या माणसाला आई काय असते आईचे प्रेम कसे असते हे माहित नसतांना देखील दुसर्‍यांच्या आई मधे स्वत:ची आई शोधणारे पी.आर. पाटील आहे. म्हणून मातृवंदनाच्या माध्यमातून मातांचे सत्कार करण्याचे ठरवले आणि तेरा वर्ष या कार्यक्रमला झाले असल्याचे सांगितले. यावेळी सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे यासह अनेक पुरुष व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.