आई- बाबा तुमच्यासाठी मी काहीही करू शकलो नाही…!

0

बदनामीच्या ताणतणावातून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या ः खिशात सापडली सुसाईड नोट

जळगाव – आई व बाबा तुमच्यासाठी मी काहीही करू शकलो नाही, वेळेवर गोळ्या व औषधी घेत चला, बाबा तुम्ही आईला घेऊन बहिणीकडे राहायला जा, येथे आपले कोणीही नाही माझी बदनामी केल्यामुळे मी जात आहे ईश्वर त्यांना चांगली बुद्धी देवो’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून डिगंबर विठ्ठल पाटील (वय 34 रा. हिंगोना ता. चोपडा) याने जळगाव- भादली या अपलाईनवर रेल्वेसमोर झोकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 8.45 वाजता घडली. दरम्यान नेमक कोण व कशासाठी बदनामी करत होतो, हे पोलीस चौकशीत समोर येणार आहे.

खिशातील डायरीमुळे झाला नातेवाईकांशी संपर्क
रेल्वे स्टेशनचे प्रबंधक डी.एम.पारधी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात भादली-जळगाव दरम्यान असलेल्या खंबा क्रमांक 421/12-14 येथे तरुणाचा मृतदेह असल्याची खबर दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी तसेच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धावत घेतली. व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तरुणाच्या खिशात डायरी होती. त्यातील संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. सदरची माहिती देण्यात आली. तरुणाचा चुलतभाऊ तसेच शहरातील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. ओळख पटविल्यावर हा तरुण डिगंबर विठ्ठल पाटील असल्याचे स्पष्ट झाले.

पॅन्टच्या खिश्यात सुसाईड नोट सापडली
डिगंबरच्या पॅन्टच्या खिशात सुसाईट नोट आढळून आली. यात ’आई व बाबा तुमच्यासाठी मी काहीही करू शकलो नाही, वेळेवर गोळ्या व औषधी घेत चला, बाबा तुम्ही आईला घेऊन बहिणीकडे राहायला जा, येथे आपले कोणीही नाही माझी बदनामी केल्यामुळे मी जात आहे ईश्वर त्यांना चांगली बुद्धी देवो’, असा आशय असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. डिगंबर हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्याचे चोपडा येथे प्लायवुडचे दुकान होते. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी आणि आईवडील असा परिवार आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास शनिपेठचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कोलते करीत आहे.