आंदोलनाला अखेर यश : कंडारी रस्ता खुला

कंडारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांसोबत महाप्रबंधकांची बैठक : शिवसेनेही दिला होता आंदोलन इशारा

भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने भुसावळ कंडारी रस्ता बंद केल्याने आबालवृद्धांसह महिला व कर्मचार्‍यांची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गैरसोय होत होती. या संदर्भात शिवसेना, कंडारी ग्रामपंचायत, ऑर्डनन्स फॅक्टरी संयुक्त कृती समिती, भुसावळ यांनी वेळोवेळी ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनास निवेदने दिली होती तर सोमवारी कंडारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी महाप्रबंधक वसंत निमजे व अन्य अधिकार्‍यांची बैठक होवून त्यात विविध मागण्यांवर चर्चा होवून रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मागणीला यश
दरम्यान, कंडारी रस्ता बंद करण्यात आल्याने प्रांताधिकारी यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शिक्षक सेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे व शिवसेना पदाधिकारी यांनी दोन दिवसात रस्ता खुला न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 24 मे रोजी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने हा रस्ता नागरीकांसाठी खुला केल्याने मागणीला यश आले असल्याचे शिवसेना पदाधिकार्‍यांनी कळवले आहे.

पाच हजार नागरीकांना दिलासा
दीड किलोमीटरचा फेरा वाढल्याने पाच नागरीकांना मोठा दिलासा मिळाला असून इंधनावरील खर्चातही आता बचत झाली आहे शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांना दवाखान्यात दाखल करतांना होणारी गैरसोय दूर झाली आहे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी हा रस्ता खुला करण्यासंदर्भात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. रस्ता खुला झाल्याने रेल्वे, ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर कर्मचारी, हात मजूर व परीसरातील सर्व नागरीकांना दिलासा मिळाला असल्याचे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी म्हटले. सर्व शिवसेना पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामस्थ आणि कृती समिती सदस्य यांनी जनरल मॅनेजर वसंत निमजे यांचे आभार मानले आहेत.

ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची प्रशासनासोबत बैठक
सोमवारी महाप्रबंधक वसंत निमजे, लेफ्टनंट कर्नल ए.एस.देशपांडे, प्रशासनिक अधिकारी तरुण कुमार, सुरक्षा अनुभाग प्रमुख रवींद्र मेढे यांची ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा नितीन कोळी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे, पोलिस पाटील रामा तायडे, सदस्य संतोष निसाळकर, विनायक वासनिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी करीत होणार्‍या गैरसोयीबाबत उपस्थित अधिकार्‍यांना माहिती. प्रसंगी ऑर्डनन्स प्रशासनाने रस्ता बंद करण्यामागे कोविडमुळे रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी बाहेर न पडण्याचे कारण सांगितले व यामुळे कर्मचार्‍यांचे कोविडपासून संरक्षण होत असल्याची भूमिका मांडली मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने रस्ता खुला करण्यात आला.