आंतर विद्युत क्रीडा स्पर्धेत राज्यभरातील खेळाडू सहभागी होणार

0

भुसावळ : विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे अधिकारी तसेच कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सुदृढ रहावेत त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून महानिर्मितीच्या वतीने आंतरविद्युत केंद्र बाह्यगृह क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा हे यजमानपद भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने स्वीकारले आहे. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तीन दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील विद्युत केंद्रांचे संघ यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता अभय हरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, आदी उपस्थित होते.

दीपशक्ती क्रीडासंकुलात रंगणार सामने
स्पर्धेचे उद्घाटन दीपशक्ती क्रीडासंकुल येथे 30 रोजी सकाळी 8.30 वाजता महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर यांच्या हस्ते होणार आहे. तर आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक रणजितसिंह ठाकूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भुसावळ वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांचे मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठण केले असून आयोजनाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आयोजनाचे काम अंतिम टप्प्यात
स्पर्धेचे परीक्षण जळगाव जिल्हा क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच करणार आहेत. बाह्यगृह क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, मैदानी खेळ, बास्केटबॉल निवड चांचणी इत्यादी खेळांचा समावेश असून चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ, नाशिक, परळी, पोफळी, मुंबई आणि उरण इत्यादी विद्यूत केंद्रांचे संघ सहभागी होणार आहेत. सुमारे 400 पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

मैदानाची केली विभागणी
महानिर्मितीच्या नामवंत तसेच प्रतिभासंपन्न खेळाडूंच्या सहभागामुळे हि क्रीडास्पर्धा अतिशय चुरशीची आणि दर्जेदार होणार आहे. यानिमित्त दीपशक्ती क्रीडा संकुलात स्पर्धेची तयारी करण्यात आलेली असून या मैदानाची विभागणी करण्यात येऊन विविध क्रिडा प्रकारासाठी वेगवेगळे विभाग पाडण्यात आले आहेत. महानिर्मिती कंपनीच्यावतीने मानव संसाधनांना विशेष महत्त्व तसेच प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. तरी सर्व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता अभय हरणे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, तसेच मुख्य समन्वयक क्रीडा आयोजन समिती यांनी केले आहे.