आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक पं. तुळशीदास बोरकर यांचं निधन

0

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक ‘पद्मश्री’ पंडित तुळशीदास बोरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं सोलो हार्मोनियम वादनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा व्रतस्थ कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पंडित तुळशीदास बोरकर यांना काही महिन्यांपूर्वी हार्नियाचा त्रास झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया होऊन ते घरीही परतले होते. परंतु पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना टीबीचा विकार जडल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. त्या आजारावरही उपचार सुरू होते. मात्र, वयोमानामुळं त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आज अखेर त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे.