आंतरपीक म्हणून गांजाची लागवड ; शिरपूर पोलिसांकडून तीन लाखांचा गांजा

Ganja Farming On Shirpur Police’s Radar : 3 Lakh Plants Seized Again, Case Against One शिरपूर : तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारात तीन दिवसांपूर्वीच धुळे गुन्हे शाखा व शिरपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत 15 लाखांच्या गांजा शेतीवर कारवाईचा बुलडोजर फिरवल्यानंतर शिरपूर पोलिसांनी पुन्हा याच शिवारातील गांजा शेतीवर कारवाई करीत तीन लाखांचे पीक जप्त केल्यानंतर अल्पावधीत गांजा शेती करून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणार्‍या गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी फेका वळवी (लाकड्या हनुमान, ता.शिरपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पावधीत श्रीमंतीसाठी गांजा शेतीला पसंती
लाकडया हनुमान येथील शिवाजी फेका वळवी याने कसत असलेल्या शेतात प्रतिबंधीत असलेला मानवी मेंदूस परीणाम करणार्‍या गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना बुधवार, 2 रोजी मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह लाकडया हनुमान गावशिवारातील शेतात छापा टाकत गांजाची 176 झाडे जप्त केली. एकूण तीन तीन लाख तीन हजार 200 रुपये किंमतीची 151 किलो 600 ग्रॅम वजनाची गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त करण्यात आली. कॉन्स्टेबल योगेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी वळवी विरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक संदीप पाटील, भिकाजी पाटील, एएसआय कैलास पाटील, हवालदार पवन गवळी, खसावद, जगदीश मोरे, आरीफ पठाण, शिंदे, परशुराम पवार, रोहिदास पावरा, गायकवाड, जयेश मोरे, योगेश मोरे, सईद शेख, मनोज पाटील यांच्या पथकाने केली.