Private Advt

अ‍ॅल्युमिनिअम तार चोरटे निंभोरा पोलिसांच्या जाळ्यात

निंभोरा पोलिसांची गस्तीदरम्यान यशस्वी कामगिरी : वाहतूक करणारा टेम्पोही जप्त : चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता

खिर्डी : निंभोरा पोलिसांनी गस्तीदरम्यान सात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 60 हजार रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनियम तार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी तांदलवाडी शिवारातून ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र शांताराम पवार (35), बंटी उर्फ जालमसिंग संजय भील (25), आकाश संजय पाटील (21), लखन प्रल्हाद पाटील (23), समाधान उर्फ राहुल युवराज गुजर (27), दिनेश ईश्वर गुजर (28), जितेंद्र अशोक पाटील (24, सर्व रा.शिंदी सुरवाडे, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गस्तीदरम्यान अडकले चोरटे
निंभोरा पोलिस ठाण्याचे हवालदार विलास झांबरे हे 9 रोजी पोलिस वाहनाद्वारे गस्त घालत असताना बलवाडी-तांदलवाडी रस्त्यावरील सिंगत गावापुढे रात्री 12.30 वाजेनंतर टाटा कंपनीची मालवाहू गाडी (एम.एच.19 सी.वाय.7714) ही संशयास्पदरीत्या उभी असल्याने चालकाची चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर निंभोरा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. सहाय्यक निरीक्षक गणेश धूमाळ व पोलिस नाईक ईश्वर चव्हाण यांनी धाव घेवून वाहनाची तपासणी केली असता त्यात 60 हजार रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनिअम तारांचे बंडल आढळले.

चार लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त
चालक जितेंद्र शांताराम पवार याला बोलते केल्यानंतर त्याने साथीदारांची नावे सांगत चोरीच्या उद्देशाने या भागात आल्याची कबुली दिली. संशयीताकडून टेम्पोसह चार लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहे.