अ‍ॅम्बिशन क्रीडा महोत्सवाचे आयोजन

0

शिरपूर : शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातर्फे दरवर्षाप्रमाणे दि.१८ व दि.१९ जानेवारी रोजी संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांच्या अ‍ॅम्बिशन क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल राहतील. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार काशिराम पावरा, उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्या हस्ते होणार असून बक्षिस वितरण १९ रोजीच दुपारी २.३० वाजता करण्यात येईल.

त्याआधी दि.१८ रोजी आर.सी.पटेल मेन बिल्डींगच्या मैदानावर मुलामुलींसाठी १४ वर्षेखालील व १७ वर्षेखालील गटांमध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, धावण्याच्या शर्यतीत १०० मीटर, २०० मी, ४०० मीटर धावणे, ४ बाय १०० मी रीले, लांब उडी, उंच उडी, शॉटपुट, स्कीपींग, बुद्धीबळ, बॅडमिंटन, कॅरम यासह अनेक खेळ व आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर फुटबॉल, क्रिकेट स्पर्धा होतील. दि.१९ रोजी फार्मसी कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट व फुटबॉलचे अंतिम सामने होतील. तसेच धावण्याच्या स्पर्धा होतील. ए.आर.पटेल सीबीएसई स्कूलमध्ये कॅरम व स्किपींगच्या स्पर्धा घेण्यात येतील.

अ‍ॅम्बिशन क्रीडा महोत्सवात संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी-खेळाडू सहभागी होत आहेत. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विविध खेळ व कसरती सादर करण्यात येतील. सर्व विजेत्या खेळाडूंना पदके, प्रमाणपत्रे, चषक, प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात येईल. या क्रीडा महोत्सवात विविध शाळांच्या खेळाडूंचा गट करुन दि.२३ व दि.२४ डिसेंबर रोजी शिरपूर व वाघाडी तसेच दि.२६ व दि.२७ डिसेंबर रोजी भोरखेडा व गरताड या चार क्लस्टरला स्पर्धा झाल्या. या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये हजारो खेळाडूंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. सर्व २३ माध्यमिक शाळांमधील सर्व विजयी झालेले खेळाडू दि.१८ व दि.१९ जानेवारी रोजी शिरपूर येथे भव्य व दिमाखदार अशा क्रीडा महोत्सवात खेळण्याचा आनंद लुटतील. यासाठी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व पंच असे अनेक जण परीश्रम घेत आहेत.