‘अ‍ॅण्टी कोविड फोर्स’साठी 3 हजारावर नोंदणी

0

नंदुरबार: कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तरुणाईने ‘जोश-ए-वतन बढाए जा’ या भावनेने मोठ्या प्रमाणत ‘अ‍ॅण्टी कोविड फोर्स’साठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. सोबत एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक आणि नेहरु युवा केंद्राच्या सदस्यांनीही यात सहभाग घेतला आहे.

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्‍यांची संख्या मर्यादित असल्याने सुरक्षेवर बराच ताण पडत आहे. शिवाय या संकटाच्या काळात अनेक ठिकाणी मदतीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी एसीएफची संकल्पना राबविण्याचे निश्चित केले. त्याला नेहरु युवा केंद्र आणि शिक्षकांकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला. एनवायकेचे 183 सदस्य, 161 शिक्षक आणि एनसीसीच्या 61 विद्यार्थ्यांनी एसीएफमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली.
गावपातळीवर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने तिथल्या युवकांना सहभागी करून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा करून देण्यात आली. नोंदणीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी फेसबुक संवादाद्वारे केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 2 हजार 847 स्वयंसेकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
नंदुरबारला सर्वाधिक नोंदणी
नोंदणीत सर्वाधिक 1 हजार 154 नंदुरबार, 786 शहादा, 368 नवापूर, 301 तळोदा, 167 अक्कलकुवा आणि 71 व्यक्ती तळोदा तालुक्यातील आहेत. यातील बहुतेक 20 ते 30 वयोगटातील तरुण आहेत. पोलिसांना मदतीसाठी 1 हजार 498, क्वॉरंटाईन केंद्राची देखरेख 48, निवारा केंद्र 52, स्वच्छता कार्य 88, नगरपालिकेला सहकार्य 82 आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी 341 स्वयंसेवकांनी तयारी दर्शविली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून अनेक तरुणांनी आपले मोबाईल क्रमांक देऊन सहकार्याची तयारी दर्शविली आहे. देशभक्तीच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आपण काही वाटा उचलू इच्छितो, अशा आशयाच्या प्रतिक्रिया युवकांनी दिल्या आहेत. काहींनी वाहन सुविधा, जीवनावश्यक वस्तू देण्याची तयारी दर्शविली आहे. तर लॉकडाऊनमुळे गावाकडे आलेल्या सुरक्षा रक्षकांनी यात सहभाग घेण्याचे मान्य केले आहे.
विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी सेवा कार्यात सहभागी होण्याची तयारी असल्याचे कळविले आहे. जिल्हा वारकरी संप्रदायातील सदस्यांनी सेवा कार्यात रस दाखविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून संकटाच्यावेळी जिल्हा एक झालेला दिसून येत आहे. सर्व जाती-धर्मातील स्वयंसेवक स्वत:हून पुढे येत आहेत.

Copy