Private Advt

अ‍ॅड.विजय दर्जी यांच्या कार्यालयातून म्हाडाचे दोन प्रवेशपत्र जप्त : संशयीताला 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी

जळगाव : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणात जळगावातून बालाजी प्लेसमेंटचे संचालक अ‍ॅड.विजय दर्जी यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. गुरुवारी संशयीताला न्यायालयात हजर केले असता 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, दर्जी यांच्या कार्यालयाच्या झडतीदरम्यान म्हाडाचे दोन प्रवेश पत्र जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

म्हाडा पेपर फुटीचे प्रकरणही रडारवर
अ‍ॅड.विजय दर्जी यांची बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात. दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांच्या टीईटी घोटाळ्याची तपासणी सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्रकरणही समोर आले आहे. या प्रकरणात दर्जींच्या कार्यालयातील एका कर्मचार्‍याची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानुसार बुधवारी पथक जळगावात धडकले. पथकाने चौकशीअंती अ‍ॅड.दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेले आहे. टीईटी घोटाळ्याच्या तपासातूनच म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळा समोर आला. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके या घोटाळ्यांचा तपास करत आहेत. टीईटी घोटाळ्यात बीडचा मुख्य संशयीत राजेंद्र सानपला अटक केल्यानंतर सानप हा जळगावचा विजय दर्जी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांचे मोबाईलचे सीडीआर काढले असता दर्जी आणि सानप हे एकमेकाच्या संपर्कात असल्याचे फोन रेकॉर्डवरून उघड झालल्याने सानपच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी दर्जीकडे लक्ष केंद्रित केले.

तांत्रिक पुराव्याच्या आधारावर कारवाई
मोबाईल कॉल डिटेल्स, ऑनलाईन व्यवहार, मेल यासह इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर अ‍ॅड.दर्जी यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत नेमके काय निष्पन्न यावरून पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. दरम्यान, चाळीसगावसह पारोळा, अमळनेर व यावलमधील काही संशयीत आता पथकाच्या रडारवर असल्याची माहिती आहे.