अहवालाअंती दोषींवर कारवाई केली जाईल

0

जळगाव। जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने करावयाच्या एमपीडीए कारवाई करण्यासाठी अमळनेर येथे गेलेल्या पथकाच्या हाती तुरी देऊन संशयीत आरोपी निसटून गेल्या प्रकरणी चुक कोणाची? हे तपासण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश दिले असून अहवालाअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असे संकेत शनिवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व्ही.के. चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिले. जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक तपासणीसाठी ते येथे आले होते. सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात ते बोलत होते. वार्षिक तपासणीत त्यांनी पोलीस प्रशासन कार्यपध्दतीचा आढावा घेतला. एकूणच जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केले.

कंट्रोलला केले होते जमा
एमपीडीए कारवाईसाठी गेलेल्या पथकास संशयीत आरोपी चकवा देऊन पसार झाला? याप्रकरणी प्रभाग अधिकार्‍यास दोषी धरून त्याची उचलबांगडी कंट्रोलरूमला करण्यात आली. परंतु आठ दिवसांनी पुन्हा त्यांची अमळनेर येथे नियुक्ती करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केल्यावर श्री चौबे म्हणाले, या कारवाई दरम्यान नक्की काय झाले? हे तपासून घेण्याच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर हे चौकशी करीत आहेत. संशयीत आरोपीस कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले? अधिकार्‍याने ताब्यात घेतले? की संशयीतास कोणी पूर्व कल्पना दिली? याची पुढची चौकशी होईल.हा अहवाल आल्यावर दोषी जो असेल त्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.

पुणे येथे जाणार पथक
जळगाव येथे एका दुकानातून सिगरेट पाकीटाची मोठी चोरी झाली होती.अशाच पध्दतीची चोरी पुण्यात झाली होती. हा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पुणे येथे रवाना करण्याची सुचना त्यांनी केली. जिल्हयात घरफोडीच्या गुन्हयात 39 ने वाढ झाली, हे लक्षात घेऊन त्यांनी अशा गुन्हयात अधिक लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्याचे सुचित केले. चाळीसगाव येथील धाडसी दरोडयाती संशयीत नजरेआड असून ते लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच घरफोडींर विशेघ लक्ष देण्याचे त्यांनी सुचना केल्या.