अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात शनिवारी सकाळी आग लागून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू ओढवला होता. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचाराधीन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले तसेच जिल्हाधिकार्‍यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

आग लागल्याने दहा रुग्णांचा मृत्यू
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी 10 वाजता आग लागली. या आगीमध्ये सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

दोषींवर कारवाई करा : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस
या दुर्घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

Copy