असं काही झालं की, त्यांचं स्वप्न भंगलं

0

चिन्मय जगताप / जळगाव

कोरोना विषाणूचे अनपेक्षित संकट येताच केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले. अजूनही ते पूर्णपणे शिथील झालेले नाही. जगभर सर्वत्र हीच स्थिती असल्याने जागतिक अर्थव्यवस्थाही संकटात आली आहे आणि त्याला भारतही अपवाद नाही. उत्पादन ठप्प, ग्राहकांकडून बाजारात मागणी नाही, अशी विचित्र स्थिती दोन ते अडीच महिने होते. यामुळे जे आर्थिक नुकसान झाले त्यात टिकून राहण्यासाठी खासगी क्षेत्रात अनेक ठिकाणी नोकरदारांच्या वेतनात 15 ते 40 टक्केपर्यंत कपात केली गेली आहे. त्याचा दुसरा परिणाम नोकरदारांच्या स्वप्नपूर्तीवर झाला आहे. घरखरेदी हे त्यापैकी एक आहे. वेतन कपातीमुळे नोकरदारांना अपेक्षित कर्ज मिळेनासे झाले आहे. बँकांनाही आपल्या नियमांचे पालन करावे लागत आहे. त्या पलीकडे जाऊन कर्ज देता नाही. वार्षिक किती उत्पन्नासाठी, किती कर्ज मिळेल आणि त्यावरील व्याजदर याच्या अटी-शर्ती प्रत्येक बँकेनिहाय वेगवेगळ्या आहेत.

राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना मार्च महिन्यात 75 टक्के वेतन कपातीला सामोरे जावे लागले होते. कपातीची रक्कम त्यांना नंतर मिळाली. मात्र, खासगी क्षेत्राचे चित्र थोडे वेगळे आहे. 15 ते 40 टक्केपर्यंत वेतन कपात केली गेली आहे. त्यामुळे अनेकांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. प्राथमिकता बदलल्या आहेत. हातात पैसाच नसल्याने खासगी क्षेत्रातील किमान 25 टक्के नोकरवर्गाने कोरोना काळात गृहकर्ज घ्यायचे टाळले असल्याची माहिती सरकारी बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या दहशतीने घात केला, मार्चपासूनच परिणाम

कोरोना प्रादूर्भावाच्या दहशतीमुळे जनता बाहेर निघायला घाबरत होती. घरांच्या बांधकामांच्या ठिकाणीही कामगार नव्हते. बँकांमध्ये कर्मचारी, अधिकारी कमी संख्येने कार्यरत होते. यामुळे ज्यांना गृहकर्ज हवे होते त्यांना ते मिळू शकले नाही. त्यामुळे मार्चपासूनच बांधकाम क्षेत्रात पितृपक्षाला सुरुवात झाली असल्याचे मत बांधकाम उद्योजक श्रीराम खटोड यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या भितीमुळे येत्या काळात कुटुंब व्यवस्था बदलेल आणि लोक नवीन घर घेतील, असेही खटोड यांनी सांगितले.

शहरातील बहुसंख्य जनतेचे वेतन 50% ने कापले गेले आहे. त्यामुळे ज्यांना आम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत 30 लाखांचे कर्ज देऊ शकत होतो, त्यांना आता फक्त 15-20 लाख इतकेच कर्ज देऊ शकत आहोत. त्यामुळे कित्येकांनी गृहकर्ज घ्यायला नापसंती दाखवली आहे. अंदाजे 50 टक्के ग्राहक परत जात आहेत.        – स्वप्नील परदेशी, विक्री प्रतिनिधी, एचडीएफसी होम लोन

Copy