अवैध सावकारीबाबत जिल्ह्यात तीन ठिकाणी छापेमारी

0

जळगाव: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सावकारी विरोधात अनेक तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सहकार विभागाच्या तीन पथकांनी आज जळगाव व कासोदा (ता.एरंडोल) येथे अवैधरित्या सावकारी करणार्‍या तीन जणांच्या घरी व दुकानांवर छापे टाकून कारवाई केली आहे. अवैधरित्या सावकारी बाबत अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. यामुळे अवैधरित्या सावकारी करणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली.

जिल्हा सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी तीन पथके नियुक्त केली. त्यात सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक व छापा पथकप्रमुख के.पी.पाटील(एरंडोल), जी.एच. पाटील(अमळनेर) आणि विलास गावडे (जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली ही पथके नियुक्त करण्यात आली. जळगाव व कासोदा येथे तीन जण अवैधरित्या सावकारी करणार्‍यांच्या दुकानाची व घराची तपासणीसाठी अचानक सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान छापे टाकण्यात आले. त्यात सपना शैलेश बियाणी, शैलेश श्रीराम बियाणी, श्रीराम गणपत बियाणी यांच्या जळगाव व कासोदा येथील दुकाने व घरांवर छापे टाकले. त्यात ते अवैधरित्या सावकारी करताना आढळून आले. त्यांच्याकडून सावकारी व्यवहाराची अनेक कागदपत्रे, फाईल जप्त करण्यात आल्या आहेत.जळगाव येथील छाप्यात विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली आय.बी. तडवी, चेतन राणे, नीलेश घाटोळ, संगीता गायकवाड यांचा सहभाग होता.

कारवाईमुळे खळबळ

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सावकारसंदर्भात यापुर्वीही सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. नुकतेच संतोष बिडवई यांनी जिल्हा उपनिबंधक पदाचा पदभार घेतला असुन सहकार विभागाने वर्षभरात अशी धडक कारवाई केल्याने अवैध सावकारी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. अशी कारवाईची मोहीम सहकार विभागाने वर्षभर सातत्याने केल्यास अनेक अवैध सावकार समोर येतील.

जिल्हा सहकार विभागाकडे अवैध सावकारीबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार छापे टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त केलेल्या कागतपत्रांची तपासणी करून गुन्हा दाखल करण्याची आणि संबंधित तक्रारदाराला न्याय मिळवुन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक, जळगाव