अवैध वीट भट्ट्यांचा महापूर

0

नंदुरबार। (भरत शर्मा) – नंदुरबार जिल्ह्याला निसर्गाचे वरदान मिळालेले आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेची सीमा तापी नदी तर उत्तरेची सीमा सातपुडापर्यंत आणि नर्मदा नदी एवढ सगळ काही असुनही प्रशासनातील गाफील अधिकारी व कर्मचार्यांमुळे नैसर्गिक संसाधनांची नेहमीच लूट करण्यात आली आहे. त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे शहादा तालुक्यातील म्हसावद, मंदाणे, कोठळ इ. परिसरात आजच्या स्थितीत शेकडो वीटभट्ट्या.नंदुरबार जिल्ह्यात आजच्या घडीस वीट व्यावसायिकांचा जणू काही महापूर आल्यासारखे दिसत आहे. मध्यप्रदेशातून येणारे हे व्यावसायिक स्थानिकांना पुढे करून कोणतीच परवानगी न घेता तसेच गौण खनिजाच्या बाबतीत शासनाची फसवणूक करून शासनाला लाखो रूपयांचा महसूल बुडवित आहेत. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र आंधळे बनून काही वेळा या लोकांशी ’अर्थपूर्ण’ संबंध ठेवून शासनाचा विश्‍वासघात करतांना दिसत आहेत. यामुळे महसूल प्रशासनाने गौण खनिज या बद्दल आतातरी थोडे जागृत व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तहसीलदारांनी तपासणी करावी
शहादा तहसीलदार नितीन गवळे यांनी म्हसावद, परिसरातील रामपूर, फत्तेपूर, आमोदा, लक्कडकोट, राणीपूर या परिसरात सुरू असलेल्या शेकडो वीट भट्ट्यांची तपासणी करावी व त्यानंतर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. महसूल विभागाच्या अधिकार्यांनी त्यांच्या विभागातील स्थानिक पातळीवर काम करणार्या कर्मचार्यांनाही त्याबाबत प्रश्‍न विचारणे गरजेचे आहे व वेळ आल्यास दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे या प्रकारच्या प्रकरणांवर आडकाठी येणार आहे. तहसील विभागात विचारणा केली असता तहसील कार्यालयाने सगळ्यांना वीटभट्टी सुरू करण्याची परवानगी नाकारली असल्याचे सांगण्यात आले मग एवढ्या वीटभट्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत हाच मोठा गहन प्रश्‍न आहे.

कर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाचा कर बुडविणारे गरीब वीटभट्टीचे मालक स्वताच्या दळणवळणासाठी मात्र चक्क वातानुकूलीत वाहनांचा वापर करतात. याचा अर्थ ह्या सगळ्या गौण खनिज चोरीच्या अर्थचक्रात प्रशासनातील महसूल विभागाच्या कर्मचार्यांची भूमिका मात्र संशयास्पद दिसून येते आहे. कारण मुख्य मार्ग असलेल्या शहादा ते धडगाव या मार्गावर म्हसावद गावाहून दरा या गावापर्यंत जवळपास 50 वीटभट्टांच्या भट्ट्या बिनबोभाट सुरू आहेत. या मार्गावर अधिकारी तसेच पदाधिकार्यांची नेहमीच वर्दळ असते मग हे वीटभट्ट्याचे गौडबंगाल यांना समजत नाही काय ? पदाधिकार्‍यांची प्रशासकीय यंत्रणेला याबद्दल कधी विचारले काय ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वन जमिनीवरील मातीचे परवानगी न घेता उत्खनन
कोणतीही परवानगी न घेता प्रशासनातील काही महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करून हे परराज्यातून (मध्यप्रदेश) आलेने वीट भट्टीचे मालक नंदूरबार जिल्ह्याच्या नैसर्गिक संसाधनांचा घातक रितीने वापर करीत आहेत. कोणत्याही सक्षम अधिकार्‍याची परवानी न घेता हे मध्यप्रदेश राज्यातील वीटभट्टाचालक परिसरातील स्थानिक रहिवाशींच्या नावाचा गैरवापर करून कधी थोड्या फार पैशाचे आमिष दाखवून त्यांचा कार्यभाग साधत आहेत. वनजमिनीवरील मातीचे कोणतीही परवानगी न घेता उत्खनन करीत आहेत. त्यामुळे चांगल्या जमिनीही हे लोक खराब करीत आहेत. त्याचप्रमाणे हे वीटभट्टी चालविणारे महाभाग आणत असलेल्या मातीची रॉयल्टी सुद्धा शासनास अदा करीत नसतात. म्हणजेच एका प्रकारे हे सगळे शासनाच्या मालमत्तेची संगनमताने चोरीच करीत आहेत. मग प्रशासन करते तरी काय ? असा सवाल नागरिक करत आहेत.

वीटभट्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू?
एवढ्या मोठ्या प्रमाणावर या परिसरात वीटभट्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. तसेच महसूल विभागाचे कर्मचार्यांमध्येही याबद्दल कुजबुज सुरू आहे. आता यावर शहाद्याचे तहसीलदार (उत्कृष्ट महसूल अधिकारी) काय भूमिका घेतात या लोकांवर कारवाई करतात की युती करतात. हजारो ब्रास चांगल्या प्रतिची माती विनापरवानगी रॉयल्टी न भरता वीटा बनविण्यासाठी वापरली जात आहे. मात्र परिसरातील महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्यासारखे दिसत आहे. कोणाचे पोट भरत असेल त्याला कोणाचाच विरोध नसतो मात्र पर्यावरण व नैसर्गिक संसाधनांचे नुकसान होत असेल तर शासनाने त्याकडे लक्ष द्यावयास हवे. थोडेसे अर्थपूर्ण संबंध जोपासण्याकरीता राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान करणार्या महसूल विभागाच्या या प्राथमिक पर्यवेक्षकीय यंत्रणेस जबाबदार धरून यांचेवर कारवाई केल्याशिवाय चुकीचे काम करणार्‍यांवर चाप बसणार नाही.

नागरिकांना सोसावा लागत आहे त्रास
या भट्ट्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी जबाबदार असणार्‍या त्या-त्या गावातील ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कारवाई करावी अथवा या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी सोपवावी, अशी अपेक्षा जनसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे. वीटांची वाहतूक करताना त्या वीटांचे कण वाहतूक करतांना हवेत उडतात व वीट वाहतूक करणार्या वाहनाच्या मागून येणार्‍या दुचाकीस्वार, पायी चालवणारे अशा प्रवाशांच्या डोळ्यात मातीचे कण उडतात व त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. वीटभट्टी चालकांना प्रशासनाने योग्य तर्हेने समज देऊन विनापरवानगी व्यवसाय करणार्‍या या मालकांवर शासनाने अवैधरित्या गौण खनिजाची चोरी केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.