अवैध मद्यसाठा घेऊन जाणारा ट्रक उलटला

3

नवापूर:अवैध मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला असता चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक शहरातील नाल्यात पडल्याची घटना सोमवारी घडली. ट्रक पडल्यानंतर चालक पसार झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्यांची नोंद करण्याचे काम सुरू होते असे नवापूर पोलिसांनी सांगितले.

सविस्तर असे, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नाल्यात मद्यसाठा नेणारा ट्रक पडला. दारूचे खोके वाहण्याच्या इराद्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. मात्र, पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचल्याने नागरिकांचा डाव फसला. यात पोलिसांच्या समक्ष संचारबंदी, जमावबंदी यासर्वाना हरताळ फासला गेला.

नवापूर येथील नारायण पूर रोड व शास्त्रीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात ट्रक (जी जे १८एक्स ९७९० ) हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला.नारायण पूर रोड व शास्त्रीनगरमधील नाल्यात मद्यसाठा असलेली ट्रक पडली, ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच संचारबंदी असूनही नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. सुरवातीला पोलीस असूनही गर्दीवर नियंत्रण करता आले नाही. नंतर गर्दी कमी झाली.

हा मद्यसाठा वैध आहे की अवैध हे अजून माहीत नाही. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा माल अवैध असल्यामुळे चोर वाटेने पसार होत होता. पलटी झालेल्या ट्रकमधून तात्काळ दारूचे बॉक्स काढण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.
हा माल कोणाचा, ट्रक कोणाची, चालक कुठं गेला, त्याचा तपास केव्हा होईल, गुन्हा कसा दाखल होतो, मद्यसाठा अवैध की वैध याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. सर्व पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित होते.

चालकाचे नाल्याजवळ नियंत्रण सुटले

ट्रकचा संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक नासिर पठाण यांनी दुपारी पाठलाग केला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने ट्रक राष्ट्रीय महामार्गवरून करंजी ओवारा मार्गे गावातून टाकली. नारायण पूरकडून शास्त्री नगर मार्ग पसार होत असताना चालकाचे नाल्याजवळ नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात पलटी झाली. चालक पसार झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन करीत आहेत.

Copy