अवकाळी पावसाने उभी पिके जमीनदोस्त, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

नगरदेवळा – रब्बी हंगामाचा हाता तोंडाशी आलेला घास मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने हिरावून नेल्याने पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे.नगरदेवळा, चुंचाळे, पिंपळगाव ,होळ, घुसर्डी, आखतवाडे सह परिसरातील मका, ज्वारी, हरभरा, गहू, शाळू, बाजरी,केळी अशा सर्व प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकलेला आहे. अवकाळी पाऊस आणि वादळाने सर्व उभी पिके जमीनदोस्त झाली असून पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाले होते त्याची कसर रब्बी हंगामात भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु या बेमोसमी हवामानाचा मोठा फटका बळीराजाला बसल्याने तो हवालदील झाला असून तातडीने शासनाने नुकसानीचे पंचनामे करून किमान नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळायला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.