अवकाळीने घास हिरावला : 30 कोटींचे नुकसान

अवकाळी वादळी पावसामुळे रावेर तालुक्यातील 757 हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त : लोकप्रतिनिधींनी केली पाहणी

रावेर (शालिक महाजन) : रावेर शहर व तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी पावसामुळे 23 गावातील सुमारे 757 हेक्टरवरील केळी आडवी झाली असून त्यामुळे सुमारे 30 कोटी 30 लाख 40 हजारांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. शासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत तातडीने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या केळीच्या बागांसह पडझड झालेल्या घरांचे पंचनाम्यांना प्रशासनाने वेग दिला असून शुक्रवारी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. रावेर तालुक्यातील तापी काठावरील निंभोरासीम, विटवा, निंबोल, ऐनपूर, धामोडी, खिर्डी, कांडवेल, सुलवाडी, वाघाडी, शिंगाडी, बोहर्डे या गावांसह सुमारे 23 गावांना वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा तडाखा बसला. शुक्रवारी दिवसभर नुकसानग्रस्त भागाची लोकप्रतिनिधी व प्रशासकीय टिमने पाहणी केली.

757 हेक्टरवरील केळी आडवी
प्रशासनाच्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील 23 गावांमधील 949 शेतकर्‍यांच्या 757 हेक्टरवरील केळी आडवी होवून 30 कोटी 30 लाख 40 हजाराचे केळीचे नुकसान झाले.

पीक विम्याचे निकष शिथील करावेत : माजी मंत्री खडसे
अनेक गावांमध्ये केळी पूर्ण बागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी ही खर्चिक पीक असून केळीसाठी फळपीक विमा योजना राबवली गेली परंतु त्याचे निकष कडक करण्यात आले त्यामुळे निर्बंध शासनाने शिथील करून केळी उत्पादकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त करीत अनेक गावांमध्ये शंभर टक्के केळी खोड जमीनदोस्त झाल्याने शेतकर्‍यांकडे आता पैसा नसल्याने शासनाचे नुकसान झालेल्या केळी खोडे शेतातून उचलून बाहेर टाकण्यासाठी मोठा खर्च येईल यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेतून नुकसान झालेल्या बागा साफसफाई करण्याला तत्काळ मंजुरी द्यावी तसेच नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांशीदेखील बोलणे झाले असून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई संदर्भात बोलणे झाले असल्याचे माजी कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांना दिली.

नुकसानीचे पंचमाने होताच भरपाई : आमदार पाटील
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांमतील केळीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त बाधीत शेतकर्‍यांना रायगड चक्रीवादळात दिलेल्या भरपाईप्रमाणे रावेर व मुक्ताई नगरच्या शेतकर्‍यायांना देण्यात यावी येत्या दोन-चार दिवसात पंचमाने पूर्ण झाले की यासाठी काही निर्णय घेण्यात येईल यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुध्दा बोलणे झाले असून शेतक-यांचे झाले असून शासनात्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले

पाहणीदरम्यान यांची होती उपस्थिती
पाहणीप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसेंसोबत, ाजी आमदार अरुण पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निळकंठ चौधरी, पंचायत सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेमूद शेख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे उपस्थित होते तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाहणीप्रसंगी त्यांच्यासोबत छोटू पाटील, निळू पाटील, राहुल पाटील, दिलीप पाटील, वसंत पाटील, नारायण पाटील, सुभाष महाजन, तुषार कचरे, प्रवीण चौधरी, जाकीर पिंजारी, अल्ताफ खान, अमोल पाटील, विनोद पाटील, भैय्या पाटील, मुकेश पाटील, यश चौधरी आदी सोबत होते. तसेच खासदार रक्षा खडसे यांनी पाहणी केली असता त्यांच्यासोबत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य जितु पाटी, प्रल्हाद पाटील, संदीप सावळे, वासुदेव नरवाडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.