अल्पवयीन चोरट्याचा साथीदारही जाळ्यात : चोरीच्या नऊ दुचाकी गुन्हे शाखेने केल्या जप्त

जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अल्पवयीन दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळताना त्याचा साथीदार दादा बारकू ठाकूर हा पसार होण्यात यशस्वी झाला होता मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले असून त्याच्या ताब्यातून जिल्ह्यात चोरलेल्या चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे दुचाकी चोरटे आरोपी केवळ होंडा कंपनीच्या दुचाकी लांबवत असल्याची बाब उघड झाली आहे.

एकूण 13 चोरीच्या दुचाकी जप्त
अल्पवयीन दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या मात्र संशयीत साथीदार दादा बारकु ठाकुर हा पसार झाल्याने त्याचा शोध सुरू असतानाच त्याला अटक करण्यात यश आल्यानंतर नव्याने नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त दुचाकींमध्ये रामानंद नगर, जिल्हापेठ, धरणगाव, जामनेर, एरंडोल, जिल्हापेठ, अमळनेर येथून चोरलेल्या दुचाकींचा समावेश आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय शामराव पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी यांनी आरोपीच्या मुसक्या बांधल्या.