अर्थे येथे लग्न समारंभावर पोलिसांची कारवाई

वरपित्यासह वधूच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर। तालुक्यातील अर्थे येथे लग्न समारंभ आयोजित करून वाजंत्रीसह गर्दी जमून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून गाव समिती व शिरपूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वरपित्यासह वधूच्या आई विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पं.स.चे गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 28 मे रोजी दुपारी करण्यात आली.

सविस्तर असे, तालुक्यातील अर्थे येथे शुक्रवारी, 28 मे रोजी नाना धुडकु साळुंखे यांच्या मुलीचा सुरत येथील वडोदरा गुजरात येथील भगवान गोविंदा रखमे यांचा मुलगा दीपक रखमे यांच्याशी विवाह समारंभाचे आयोजन केले होते. यासाठी 27 मे रोजी अर्थे बु.येथील नाना साळुंखे यांच्या घरासमोर हळदी समारंभाच्या कार्यक्रमात रात्री 8 ते 10 वाजेच्या दरम्यान 300 ते 400 लोकांनी डीजेच्या तालावर गर्दी केली असल्याचे व्हिडीओ गटविकास अधिकारी यांना मिळाले होते. तसेच 28 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विवाह समारंभात अंदाजे 100 ते 150 लोकांनी गर्दी जमवुन शासनाची कुठलीही परवानगी न घेता लग्न लावण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची गोपनीय माहिती गटविकास अधिकार्‍यांना मिळाली. मिळालेल्या माहितीची ग्रामसेवक व शहर पोलिसांना माहिती देत खातरजमा करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार 28 मे रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने व ग्रामसेवक राजेंद्र माळी, सरपंच साहेबराव पाटील, पोलीस पाटील पिरण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. माहितीत सत्यता आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी ग्रामसेवक राजेंद्र माळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन वधूची आई निर्मलाबाई नाना साळुंखे (रा.अर्थे) व नवरदेवाचे वडील भगवान गोविंद रखमे (रा. वडोदरा, सुरत) यांच्याविरुद्ध कोविड 19 साथरोग प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी.डी.पावरा करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली