अर्थसंकल्पाच्या धामधुमीत कर्जमाफीची तीव्रता

0

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पावर लागून आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धुमाकूळ सुरु असताना अर्थसंकल्प हा गोंधळामध्येच मांडला जाण्याची शक्यता आहे. आज अधिवेशनाच्या नवव्या दिवशी एकूण 4 ते 5 मिनिटांचेच कामकाज होऊ शकले. अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याने अक्षरशा रान उठवले आहे. आज राष्ट्रपतींचा दौरा असल्याने असेही कामकाज कितपत होईल याबाबत शंकाच होती. नियमित वेळापत्रकाप्रमाणे सकाळी पायऱ्यांवर घोषणाबाजी झाल्यानंतर सभागृहात तोच गोंधळ कायम राहिला. आणि थोडा वेळ वाट पाहून अध्यक्षांनी कामकाज स्थगित केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या आमदारांनी देखील सभागृहात आणि सभागृहाबाहेर आतापर्यंत जोरदार मागणी केली आहे. आतापर्यंत विरोधकांवर आवाज चढवत वेल मध्ये उतरणारे भाजप सदस्य आज एकदम चिडीचूप बसले होते. सीएम फडनवीसांची ही शाळा आहे की काय? असं राहून-राहून वाटत आहे. आतापर्यंत सत्ताधारी जुनी उनी-धुनी काढून तर विरोधक विरोधी बाण्याने एकमेकांच्या विरोधात आपला घसा फोडून ओरडतांना दिसून आले आहेत. यात शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना कमी आणि एकमेकांप्रति द्वेष जास्त दिसून येतोय. अख्ख्या महाराष्ट्रातील शेतकरी आज आशेने या अधिवेशनाकडे पाहतोय. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी करतानाचे अफलातून चित्र पाहायला मिळाले आहे. विरोधक तर सोडाच सत्ताधारी देखील आपल्या सरकारशी समझोता करू शकत नाहीत का? एवढेच काय मंत्र्यांना देखील पायऱ्यांवर बसावे लागत असेल तर सरकारसोबत समन्वय नेमका कसा असेल? हा गंभीर प्रश्न या निमित्ताने समोर येतोय.

आता प्रश्न असा आहे की उद्या महत्वाच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा एवढाच प्रभावी राहील का? अर्थात आजवरच्या भूमिकेवरून कर्जमाफीचा मुद्दा प्रभावी राहील असं वाटत आहे. मात्र उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांना अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोलणे भाग आहे. आजच आर्थिक पाहणी अहवाल आल्यावर विरोधकांकडून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याऐवजी आर्थिक पाहणी अहवालावर टीका टिपण्या आल्या आहेत. उद्या बजट सादर होताना कर्जमाफीसाठीची विरोधकांची भूमिका कायम राहते? की अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मुद्दा डायव्हर्ट होतो याकडे लक्ष लागून आहे. बाकी मागचा आठवडा वाया गेल्यानंतर हा आठवडा देखील संपूर्ण कर्जमाफीच्या नावाने गेला आहे. उद्या अर्थसंकल्प झाल्यावर पुन्हा 2 दिवसांची विश्रांती आहे. त्यामुळे नेमकं कामकाज कधी सुरळीत होईल? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

निलेश झालटे – 9822721292