अर्थप्राप्तीसाठी नव्हे तर अर्थपूर्ण जीवनासाठी शिक्षण घ्यावे

0

जळगाव : फक्त भाकरी, नोकरी आणि छोकरी असा संकुचित विचार आजच्या शिक्षण व करियर विषयी असल्याने समाज असंतुलित आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट्य काय? हेच आजच्या पालकांना युवापिढीला माहित नाही. फक्त अर्थप्राप्तीसाठी नव्हे तर अर्थपूर्ण जीवनासाठी शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत दीपस्तंभ फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, आदिवासी, अंध अपंगांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरून कृतीशील काम करणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन यांना नुकताच महाराष्ट्रातील गाजलेल्या पुण्याच्या रामतीर्थकर मास्तर स्मृती व्याख्यानमालेत मुख्य व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ‘शिक्षणावर बोलू काही’ या विषयावर बोलताना त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवश्यकता सांगितली.

जेवण उपयोगी शिक्षण नको?
महाजन पुढे म्हणाले की, आपल्याला आता जेवण उपयोगी शिक्षण हवे की जीवन उपयोगी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. फक्त पैसे मिळवणे हाच आजच्या करिअरविषयीचा दृष्टीकोन झाला आहे. यामुळे चांगले राष्ट्र व चांगला माणूस निर्माण होण्याची गती कमी आहे. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर देशाला समर्पित व सेवा भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता असल्याचे महाजन यांनी सांगितले.

महनीय वक्त्यांनी साधला आहे संवाद
ही व्याख्यानमाला २००० साली सुरु झाली. ती आजवर निरंतर सुरु आहे. या व्याख्यानमालेत आतापर्यंत गाजलेल्या सन्माननीय मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले आहे. यामध्ये डॉ. शरच्चंद्र गोखले, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अभय बंग, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ.नरेंद्र जाधव, डॉ. सी. के. प्रल्हाद, कुमार केतकर, अच्युत गोडबोले, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. यशवंत पाठक, डॉ. समीरण वाळवेकर, प्रा. डॉ. राम ताकवले, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ. विवेक सावंत, डॉ. अनिल काकोडकर या मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर विचार पुष्प गुंफले आहे. यात १७ व्या व्याख्यानाचा मान दीपस्तंभचे कार्यकारी संचालक यजुर्वेंद्र महाजन यांना मिळाला.