अरविंद केजरीवालांचे अतिरेकी राजकारण

0

पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि खलिस्तानवादी यांच्यात संशयास्पद भूमिगत सहकारी आघाडी तयार करण्यात आली होती. हे सत्य असल्यास केजरीवाल आपल्या राजकीय फायद्यासाठी अण्णा हजारे नंतर फुटीरवादी खलिस्तानी वाद्यांचा उपयोग करून घेऊ इच्छित आहेत असेच वाटते. राजकारणासाठी अशी हातमिळवणी राष्ट्रहितासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच या कुजबुजीची सत्यता पडताळून पाहायला हवी.

देशातील पाच राज्यांतील निवडणुका सोबत मुंबई महानगरपालिकासहित दहा महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा गदारोळ आदी अर्थसंकल्पाची चर्चा याकडेच माध्यमांनी लक्ष केंद्रित केल्याने पंजाबमध्ये 31 जानेवारीला झालेल्या बॉम्बस्फोटाची दखल गांभीर्याने कुणीच घेतली नाही. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संगरूर जिल्ह्यातील मौरमंडी गावात काँग्रेस पक्षाची प्रचार मिरवणूक संपताच कारबॉम्बस्फोट झाला. ज्यात सहाजण मृत्यू पावले व अनेक जखमी झाले.

या घटनेला आता पंधरा दिवस उलटून गेलेत. पंजाब विधानसभा निवडणूकही पार पडली. फक्त निकाल यायचे बाकी आहेत. तरीही या निवडणुकीच्या निमित्ताने 1980 च्या दशकात खालिस्तानवादी राष्ट्रद्रोही अतिरेक्यांनी रक्तरंजित केलेल्या पंजाबात पुन्हा बॉम्बस्फोट झाल्याने तेथील जनता, राजकीय निरीक्षक आणि सुरक्षायंत्रणेत एक गुप्त कुजबुज चालू झालीय.

त्या कुजबुजीचा मथितार्थ असा आहे की, पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि खलिस्तानवादी यांच्यात संशयास्पद भूमिगत सहकारी आघाडी तयार करण्यात आली होती. हे सत्य असल्यास केजरीवाल आपल्या राजकीय फायद्यासाठी अण्णा हजारे नंतर फुटीरवादी खलिस्तानवाद्यांचा उपयोग करून घेऊ इच्छित आहेत असेच वाटते. राजकारणासाठी अशी हातमिळवणी राष्ट्रहितासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच या कुजबुजीची सत्यता पडताळून पाहायला हवी. पंजाबमध्ये अकाली दल व भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीला तेथील जनता कंटाळलेली आहे. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या घराणेशाहीच्या मनमानीविरोधात जनमानसात प्रचंड असंतोष धुमसत आहे. हाच असंतोष एकत्र करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष आतुर आहेत. पंजाबची सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेस व आप यांच्यात स्पर्धा सुरू झाल्याने दोन्ही पक्षांत राजकीय जनाधाराचा शोध सुरू झाला. त्यातनूच आपचे अरविंद केजरीवाल यांनी खलिस्तानवादी मंडळीशी गुप्त संधान साधले, असा राजकीय आरोप करण्यात आलाय.

पंजाबच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष जमरिदर सिंग आणि आपचे अरविंद केजरीवाल, या दोघांनीही आपापल्या पक्षांना मजबूत केलेय. जनाधार वाढविलाय. 117 सदस्यसंख्या असलेल्या पंजाब विधानसभेत बहुमतासाठी 60 आमदार निवडून येणे गरजेचे आहे. सत्तेचा हा आकडा पार करण्यासाठी या दोन्ही पक्षांची दमछाक होण्याची शक्यताच अधिक आहे.

त्यामुळेच अतिरिक्त कुमक मिळावी या हेतूने केजरीवाल यांनी ‘खलिस्तानी’ लिबरेशन फ्रंट यांच्याशी संपर्क वाढवला, असे अनुमान काढले जात आहे. पंजाबमधील आपच्या प्रचाराची एकूण धाटणी पाहता यात कुठेतरी पाणी मुरतेय असे स्पष्टपणे समोर येते. पंजाबात बहुसंख्य असलेल्या शीख समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी केजरीवाल 1984ला दिल्लीत घडलेल्या दंगलीतील गुन्हेगारांना शिक्षा व्हावी तसेच ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान करणार्‍या घटनांना अधोरेखित करत भाषणे करीत होते. त्याच बरोबर युरोप व कॅनडा येथून आलेले परदेशी पंजाबी ‘आप’ पक्षाचा प्रचार करत होते. त्यांचा संबंध खालिस्तानवाद्यांशी आहे असे मानले जाते. याच लोकांकडून आपपक्षाला आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळालेय.

दुसरी विशेष बाब म्हणजे ब्रिटनमध्ये राहून खलिस्तानवादी चळवळ चालवणार्‍या गुरविंदरसिंग यांच्या घरी अरविंद केजरीवाल यांनी मुक्काम केला होता. त्यामुळेच पंजाबच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी खलिस्तानवादी प्रवृत्तीशी हातमिळवणी केली, असा दाट संशय त्यांच्यावर घेतला जातोय. म्हणूनच काँग्रेसचा राहुल गांधी यांनी, ‘दहशतवादाच्या काळ्या दिवसांना पुनरुज्जीवित करू पाहणार्‍या कट्टरवादी घटकांना अरविंद केजरीवाल बळ देत आहेत. असे आपल्या प्रचारात म्हटले, तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग यांनीही, आम आदमीपक्ष पंजाबमध्ये सत्तेत आल्यास पुन्हा हिंसाचार सुरू होण्याची भीती आहे. अरविंद केजरीवाल अत्यंत घातक राजकारण खेळत आहेत, असे भाष्य केलेय.

केजरीवाल यांनी सत्ता मिळवण्यासाठी फुटीरवादी खलिस्तानवाद्यांशी पडद्याआडून मदत घेतल्याची पंजाबी जनतेमधील कुजबुजीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून येतेय. भारतीय राजकारणात असे अनेकदा घडलेले आहे. क्षणिक राजकीय फायद्यासाठी राजकीय नेते फुटीरवादी प्रवृत्तींना पोसतात. कालांतराने हेच फुटीरवादीवाले भस्मासुर बनून या नेत्यांच्याच पाठी लागतात. तेव्हा देशाचे फार मोठे नुकसान घडून येते.

पंजाबमध्ये 1980च्या दशकात असेच घडले होते. काँग्रेस पक्षाने आपले राजकारण करताना अकाली दलाचे नेते संत लोंगोवाल यांच्यासमोर शीख कट्टरवादी भिंद्रनवाले यांना उभे केले. पुढे हेच भिंद्रनवाले खलिस्तानची मागणी घेऊन उभे राहिले त्यातून भयंकर असे हत्याकांड पंजाबात घडले. खलिस्तानवादी दहशतवाद मोडून काढताना आपल्याला 1984 ला पंतप्रधान इंदिरा गांधींचा बळी द्यावा लागला. हा दहशतवाद 1993 साली संपला. आपल्या राजकारणासाठी संपलेल्या खलिस्तानवाद्यांना केजरीवाल पुन्हा संजीवनी देत असतील, तर त्याचा धिक्कार व्हायलाच हवा!

– विजय य. सामंत
9819960303