‘अम्मा’नंतर तामिळनाडूत आता ‘चिनम्मा राज’

0

चेन्नई : जयललिता यांच्या निकवर्तीय ‘चिनम्मा’ नावाने ओळखल्या जाणार्‍या शशिकला नटराजन लवकरच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शशिकला नटराजन यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी रविवारी निवड झाल्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा शशिकला यांचा मार्ग मोकळा झाला आहे. महासचिव शशिकला यांच्याकडे पक्षाची व मुख्यमंत्रीपदाची धूरा देण्यात आली आहे. ओ.पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षावर कुणाचे वर्चस्व असणार याबाबत जी चर्चा सुरू होती त्यास आता पुर्णविराम मिळाला आहे. कारण जयललिता (अम्मा) यांच्यानंतर अण्णा द्रमुकमध्ये ‘चिनम्मा’राज आले आहे.

पन्नीरसेल्वम यांनी मांडला प्रस्ताव

अण्णा द्रमुक पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत शशिकला यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी पक्षाच्या सर्व आमदारांनी केली. त्यानंतर शशिकला यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. रविवारी झालेल्या बैठकीत ओ. पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आमदारांनी मंजुरी दिली. शशिकला या जयललिता यांची परंपरा पुढे नेतील, असा विश्‍वास पक्षाने व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील सरकार हे नेहमी सर्वसामान्यांसाठी काम करेल, जयललिता यांच्या आदर्शाचे पालन करेल असेही पक्षाने म्हटले आहे.

सर्व आमदारांचा पाठींबा
पक्षाचा प्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री एकच असावा. शशिकला यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे अण्णा द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. थंबीदुराई यांनी देखील म्हटले होते. तसेच जयललिता यांच्या निकटवर्तीय असल्याने तसेच महिला असल्याने या पदासाठी शशिकलाच योग्य आहेत असा सुर पक्षाच्या सर्व आमदारांनी लावला होता.

मोर्चेबांधी यशस्वी

जयललिता यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शशिकला यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते. मात्र, ओ.पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेे. मुख्यमंत्रीपदासाठी शशिकला यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती. या मोर्चेबांधणीला अखेर यश आले आहे. जयललिता पक्षाच्या महासचिव होत्या. या पदावर शशिकला यांची तर पक्षातील अन्य महत्त्वाच्या पदांवर शशिकला यांच्या निकटवर्तीयांची वर्णी लागली आहे.

कोण आहेत शशिकला?

शशिकला यांची 1980च्या दशकात जयललिता यांच्याशी भेट झाली. त्यावेळी शशिकला पक्षाच्या प्रचार सचिव होत्या. जयललिता यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्‍वासू म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. दोघींमध्ये तीन दशके मैत्री होती. 2011 साली जयललिता यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शशिकला यांच्यावर केला गेला. पती नटराजन यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यासाठी शशिकला यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात होते. यानंतर जयललिता यांनी शशिकला यांना पक्षातून काढून टाकले. आणि त्यांच्याशी सर्व संबंध तोडले. मात्र, नंतर माफी मागीतल्याने जयललिता यांनी शशिकला यांना पुन्हा जवळ केले. शशिकला पक्षाच्या महासचिव तर पनीरसेल्वम मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षात दोन सत्ताकेंद्रे झाली होती. दोन्ही नेते थेवर समाजातील असून जनाधार नसलेले आहेत. अखेर शशिकला सर्व सुत्रे स्वत:कडे घेण्यात यशस्वी झाल्या आहेत.