अमेरिकेच्या दबावामुळे शशांक मनोहरांचा राजीनामा?

0

मुंबई । आयसीसीच्या अध्यक्षपदावरून शशांक मनोहर यांनी तडकाफडकी राजीनामा देवून सर्वांना धक्का दिला.जेव्हा की शशांक मनोहर यांचा जवळपास दिड वर्षाचा कार्यकाळ बाकी असतांना त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे यावर अनेक तर्क-वितर्क चर्चिले जात होते.आयसीसीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात शशांक मनोहर यांना अमेरिकन क्रिकेट असोसिएशनचे निलंबन करणे व भारतीय क्रिकेट बोर्डाला कडक कारवाई करणे या दोन महत्वाच्या पत्रांवर स्वाक्षर्‍या करावयाच्या होत्या. या पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला व राजीनामा दिला.

यूएसए क्रिकेट असोसिएशनला नोटीस
यूएसए क्रिकेट असोसिएशनला आयसीसीने बेशिस्त कारभाराबाबत गतवर्षीच कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यांच्या बडतर्फीचा आदेश 1 एप्रिलपर्यंत निघणार होता. त्यावर अध्यक्ष या नात्याने शशांक मनोहर यांनाच स्वाक्षरी करावयाची होती.त्यामुळे मनोहरांनी राजीनामा दिला हे सत्य आयसीसीचे सीओओ आयन हिगेन आणि सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनाच ठाऊक आहे.

त्यांना एक न्याय, आम्हाला दुसरा न्याय
यूएसए क्रिकेट असोसिएशनने आपल्या बचावाची बाजू मांडताना, बीसीसीआयच्या अनागोंदी कारभाराची उदाहरणे दिली. बीसीसीआयला एक न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय, असा उलट सवाल आयसीसीलाच केला होता. त्यांनी डेलॉइट या बीसीसीआयचे व संलग्न संस्थेचे ऑडिट करणार्‍या कंपनीच्या अहवालाचा आधार घेतला होता. डेलॉइट कंपनीने जम्मू-काश्मीर, गोवा, हैदराबाद, केरळ या क्रिकेट संघटनांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची लक्तरे वेशीवर टांगली होती. गैरकारभरामुळे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रमुखांची हकालपट्टी केली. आमच्यावर कारवाई करता तर मग बीसीसीआयवर सुद्धा कारवाई करा, असा अमेरिकेचा दबाव होता.

राजीनामा देण्याचा मार्ग स्विकारला
शशांक मनोहर यांनी भारताचे (बीसीसीआय) आर्थिक नुकसान होणारा ‘बिग थ्री’ व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळातदेखील त्यांच्याबाबत असंतोष उमटला होता. अशात स्वाक्षरीने बीसीसीआयवर कारवाईची नामुष्की ओढवली असती तर मनोहर यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले असते. ते टाळण्यासाठी शशांक मनोहर यांनी राजीनामा देण्याचा सोपा मार्ग स्वीकारला.