अमृत, भूमिगत गटारींच्या कामामुळे रखडली रस्त्यांची डागडुजी

0

‘त्या’ मक्तेदारांना नोटीस बजावणार ; महापौरांनी घेतली बैठक

जळगाव: शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक प्रभागात 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून मक्तेदारांना कामाची वर्कऑर्डर देखील देण्यात आली आहे. अनेक प्रभागात अद्याप काम सुरू झालेले नसल्याने बुधवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आढावा घेतला असता अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यांची डागडुजी होत नसल्याचे समोर आले.

जळगावात शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू असल्याने रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. प्रत्येक प्रभागातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी मनपाने 50 लाखांचा निधी मंजूर केलेला आहे. प्रत्येक प्रभागासाठी मक्तेदार नेमण्यात आले असून त्यांना वर्कऑर्डर देखील देण्यात आल्या आहेत. अद्यापही अनेक प्रभागात रस्त्यांची डागडुजी सुरू झालेली नसल्याने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात मनपा अभियंता आणि मक्तेदारांची बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर चौधरी, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले यांच्यासह सर्व अभियंता आणि प्रभाग अधिकारी उपस्थित होते.

अमृत योजना, भूमिगत गटारींचे काम अपूर्ण
जळगाव शहरात सध्या अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. जळगावात प्रभाग क्रमांक 4, 6, 13, 14, 15, 16, 18, 19 मध्ये अपूर्ण आहे तर प्रभाग क्रमांक 4, 7, 8, 9, 13, 14, 15, 16, 18 मध्ये अमृत योजनेचे काम अद्याप कमी अधिक प्रमाणात अपूर्ण आहे. काही प्रभागात पाईपलाईन टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे, नळ संयोजन देण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती अभियंत्यांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांना दिले.

अशी आहे प्रभागांची स्थिती
रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक 1,2 मध्ये काम सोमवारी सुरू होईल. प्रभाग 3,4,5 मध्ये काम सुरू आहे. प्रभाग 6 मध्ये भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. प्रभाग 7 मध्ये 2-3 दिवसात काम सुरू होणार, प्रभाग 10, 11 मध्ये काम सोमवारी सुरू होणार, प्रभाग 12 मध्ये लवकरच काम सुरू होईल, प्रभाग 13, 14, 15, 16 मध्ये अमृत योजना, भूमिगत गटार काम सुरू, प्रभाग 17, 18 मध्ये भूमिगत गटारींचे काम बाकी असून प्रभाग 19 मध्ये अमृत योजनेचे काम बाकी असल्याची माहिती मक्तेदार आणि मनपा अभियंत्यांनी दिली.

मक्तेदारांना नोटीस बजवा
प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्त्यांच्या डागडुजीकामी 50 लाखांच्या कामाची वर्कऑर्डर देऊन 15 दिवस झाले आहेत. ज्या ठिकाणी काम सुरू करता येऊ शकेल परंतु अद्यापही करण्यात आलेले नाही त्या मक्तेदारांना नोटीस बजवावी, अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या.

Copy