अमित शहांच्या शुभेच्छा अन् धोनीच्या राजकीय वाटचालीची चर्चा

0

नवी दिल्ली: काल भारतीय क्रिकेट संघात आणि जगात मोठे नाव असलेले माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विविध माध्यमातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातील चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना, धोनीच्या आठवणी जागवल्या आहेत. राजकीय नेत्यांनीही धोनीच्या कारकिर्दीची आठवण करत कौतुक केले आहे, सोबतच धोनीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेतेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धोनीच्या निवृत्तीनंतर कारकिर्दीची आठवण करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अमित शहांनी दिलेल्या शुभेच्छावरून आता धोनी भाजपात प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

अमित शहा यांनी धोनीच्या उत्कृष्ट खेळीचे कौतुक करत माहीली पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी म्हटले आहे. धोनीने आपल्या हटके शैलीने लक्षावधी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते. भारतीय क्रिकेटला मजबूत करण्यासाठी यापुढेही धोनी आपले योगदान देईल, पुढील वाटचालीस शुभेच्छा… असे म्हणत धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची आठवणही शहा यांनी केली.

काल संध्याकाळी धोनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. ”माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार… 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असे समजा,” अशी पोस्ट धोनीने केली आहे. त्यानंतर पाठोपाठ सुरेश रैनाने देखील निवृत्तीची घोषणा केली. रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांना आणखी धक्का बसला.

Copy