अमित शहांचा उध्दव ठाकरेंना फोन

0

नवी दिल्ली – शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठवण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेने एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपने या मुद्द्यावर समेट घडवून आणण्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची (छऊ-) बैठकीचे निमंत्रण दिले आहे. 10 एप्रिलला दिल्लीत ही बैठक होणार आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक 10 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता भवन चाणक्य पुरी येथे बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, उपेंद्र कुशवाह, रामदास आठवले यांच्यासह सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना अमित शहा यांनी फोन करून निमंत्रण दिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या शर्यतीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रकाशसिंग बादल, माजी सरन्यायाधीश सदाशिवम यांची नावे आहेत. तर उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या शर्यतीत सुषमा स्वराज, थावरचंद गेहलोत, नझमा हेपतुल्ला, हुकूमदेव सिंह यादव यांची नावे आहेत. याशिवाय घटक पक्षांनी सूचवलेल्या नावांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवास बंदी हटवली नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. तसेच बंदी हटवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा थेट इशाराच दिला होता. मात्र, अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण देऊन या मुद्द्यावर समेट घडवून आणण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे रवींद्र गायकवाड आणि एअर इंडियातील वादच केवळ या दोन पक्षांतील कुरबुरींचे एकमेव कारण नाही. शिवसेना सरकारमध्ये सहभागी असूनही फडणवीस यांच्या सरकारवरही टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अलिकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी उघडपणे दिसून आली होती..