अमळनेर शहर पोलीस ठाण्याच्या बांधकामास अधिवेशनात मान्यता

0

अमळनेर । शहर व ग्रामीणसाठी पोलीस ठाण्याची एकच इमारत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या योग्य पाठ पुराव्या मुळे अमळनेर येथे स्वतंत्र शहर पोलीस ठाण्याचा बांधकामास या अधिवेशनात मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे. यासोबतच कर्मचारी निवासस्थानच्या बांधकामासाठी मंजुरी मिळणार असल्याची त्यांनी म्हटले आहे. एकूण 4 कोटी 80 लाख रूपये निधीतून हे काम मार्गी लागणार असून अधिवेशनानंतर हा निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतांना आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले कि, शासनाचा शहर व ग्रामीण पोलीस ठाणे स्वतंत्र करण्याचा मानस असल्याने अमळनेर शहराची गरज लक्षात घेता शहर पोलीस ठाणे निवासस्थाने बांधकामाच्या मंजुरीसाठी 6 फेब्रुवारी 2017 रोजी मुख्यमंत्री यांना पत्र दिले होते.

पोलीस ठाण्यासह 100 प्लॅट्स
यात अमळनेर मतदार संघात सुमारे 100 गावे आहेत, तालुक्याचा भौगोलिक विस्तार पाहता शहर व ग्रामीण अशी दोन पोलीस ठाणे गरजेचे आहे. परंतु सद्यस्थितील मतदार संघात एकच इमारत असून ती शहरा पासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे. शहरासाठी नवीन पोलीस ठाणे व कर्मचारी निवासस्थाने गरजेचे असल्याने या कामास त्वरेने मंजुरी मिळावी अशी विनंती केली होती त्यांनी वेळोवेळी केलेला योग्य पाठपुरवा व परिस्थिती पटवून देण्यात यश आल्याने मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनानंतर मंजुरी देण्याचे आश्वासन देवून संबंधित विभागास प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्याने शासनदरबारी त्वरित प्रस्ताव सादर झाला आहे.

यासंदर्भात पोलीस विभागाच्या मागणीबाबतही आमदाराच्या उपस्थितीत बैठक होवून नोंद घेण्यात आली. याबाबत माजी आमदारांनी याआधी प्रस्ताव सादर केला होता मात्र पाठपुरावा नसल्याने तो बाजूला टाकण्यात आला होता आता नव्याने सादर केलेल्या प्रस्तावात आधुनिक पद्धतीचे बदल करून पाचपावली देवी मंदिराजवळील पोलीस लाईनीत सर्व जुनी निवास स्थाने पाडून त्या ठिकाणी अद्यावंत पद्धतीचे शहर पोलीस ठाणे व कर्मचार्‍यासाठी भव्य संकुले बांधुन 100 अद्यावंत फ्लॅट होणार आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यात होणार मदत
शहरात स्वतंत्र पोलीस ठाण्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होणार आहे. गत वर्षभरात शहरात झालेले गैर प्रकार पाहता वातावरण दुषित झाले आहे यामुळे स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज निर्माण झाली होती. अखेर आ. शिरीष चौधरी व डॉ रवींद्र चौधरीच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे तसेच पोलीस कर्मचार्‍यांसाठी किमान 100 वर्षांपासून असलेली जुनी व जीर्ण घरे जमीनदोस्त होवून त्यांच्यासाठी अद्यावंत फ्लॅट्स उपलब्ध होणार असल्याने पोलीस कर्मचारी देखील सुखावले आहेत.

आमदारांसह अधिकार्‍यांची पाहणी
नविन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर असल्याने आमदार शिरीष चौधरीसह पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक विकास वाघ, गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक प्रा अशोक पवार, गुलाम नबीसह आदींनी जागेची पाहणी केली. यावेळी आमदारांनी अधिकार्‍यांकडून कर्मचार्‍याचा अपेक्षा जाणून घेतल्या.