अमळनेरात तीनशे वीज चोरट्यांवर कारवाई

अमळनेर : वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासह विजेची चोरी करून महावितरणाला चुना लावणार्‍या सुमारे 301 वीज चोरट्यांवर महावितरणने कारवाई केल्याने वीज चोरी करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. धरणगाव येथील कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमून 1 व 2 रोजी शहरातील वेगवेगळ्या भागात मीटर तपासणी करून कारवाई करण्यात आली.

या भागात झाली कारवाई
शहरात तांबेपुरा, सानेनगर, इस्लामपुरा यासह आदी भागात महावितरणाच्या अमळनेर शहरासह धरणगाव, एरंडोल, चोपडा येथील पथक नेमून वीज चोरी शोध मोहिम राबवण्यात आली. यात 1 ऑगस्ट रोजी 132 वीज चोरी तर 2 रोजी 169 असे एकूण 301 वीज चोरी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात आली. यासाठी धरणगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत तब्बल 110 कर्मचारी सहभागी झाले.

यांनी राबविली शोध मोहीम
उपविभागीय कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे, सहाय्यक अभियंता विजय माळी, निलेश कुरसंगे, वैभव देशमुख, देवेंद्र चौधरी, विजय गुजर, सलामे यांच्यासह जवळपास 110 वीज कर्मचारी कारवाईत सहभागी झाले.