आमेाद्यातील शेतकरी अंगावर वीज कोसळल्याने ठार

यावल : तालुक्यातील आमोदा येथील शेत शिवारात अंगावर वीज कोसळल्याने आमोद्यातील 60 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ज्ञानदेव धनु चौधरी असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

अंगावर वीज कोसळताच शेतकरी ठार
आमोदा, ता.यावल येथील रहिवासी शेतकरी ज्ञानदेव धनू चौधरी (60) हे बुधवारी आपल्या आमोदा शिवारात शेतात पिकाची मशागत करीत असताना अचानक ढगांचा कडकडाट सुरू झाला व त्याचवेळी शेतकरी ज्ञानदेव चौधरी यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत शेतकरी जागीच ठार झाला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व फैजपूर पोलिसांना माहिती दिली. फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मकसुद शेख, हवालदार उमेश सानप, गोकुळ तायडे, विकास सोनवणे यांनी पंचनामा केला. फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परीवार आहे.