अमळनेरात ऑनलाईन सट्टा अड्ड्यावर पोलिसांची धाड : चार लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर : शहरातील झामी चौकात ऑनलाईन सट्टा व जुगार सुरू असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत दोघांच्या मुसक्या बांधल्या तर 18 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला. तब्ब्ल तीन लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अमळनेर शहरातील बोरसे गल्लीत महेंद्र सुदाम महाजन हा ऑनलाईन मटका व जुगार चालवत असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पथकाने धाड टाकून कारवाई केली. लॅपटॉपसह चार मोबाईल, 20 डायर्‍यांसह तीन लाख 85 हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. जयंत गणेश पाटील (श्रीकृष्ण मंदिर) व फिरोजखान नसीमखान पठाण (अंदरपुरा, सराफ बाजार) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, महेंद्र महाजन याच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सूत्रांनी सांगत 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, हवालदार किशोर पाटील, महिला हवालदार रेखा माळी, सिद्धांत शिसोदे, रवींद्र पाटील, आशिष गायकवाड, अमोल पाटील, निलेश मोरे, अतुल मोरे, नम्रता जरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.