अमळनेरात आता छेडखानीला बसणार आळा : दामिनी पथकाची उपद्रवींवर करडी नजर

अमळनेर : अमळनेरात आता छेडखानीला बसणार आळा ः दामिनी पथकाची उपद्रवींवर करडी नजरशहरातील महिलांसह तरुणींची छेडखानी रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने दोन महिला पोलिसांचे दामिनी पथक नियुक्त करण्यात आले आहे. शहरातील अप्रिय घटनांना आळा बसण्याची आशा आता शहरवासी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, दगडफेक व चिथावणीखोर संदेश पसरवणार्‍या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

खाजगी क्लाससह शाळांभोवती पथकाचा आता वॉच
मुलीच्या अपहरणातून शहरात तणाव निर्माण झाला होता. दगडफेक झाली होती तसेच सोशल मीडियावर चिथावणीखोर संदेश पसरवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रतिष्ठीत व्यक्तींशी चर्चा केली. त्यावेळी काही तरुण मुलींचा पाठलाग करून त्यांचा नंबर मिळवतात आणि कोणत्याही प्रकारे जवळीक साधून सहानुभूती मिळवतात, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेतात, असे प्रकार घडत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्यानंतर दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली. एका दुचाकीवर दोन महिलांचे पथक महाविद्यालय, खाजगी क्लासेस, काही कोपर्‍यातील जागा आदी ठिकाणी गस्त घालत आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी नम्रता जरे व रेखा ईशी यांची दामिनी पथकात नियुक्ती केली आहे.

तणाव निर्माण करणार्‍यांना अटक
दरम्यान, सोशल मीडियावर दगडफेकीचा व्हीडिओ आणि चिथावणीखोर संदेशाचे स्टेटस ठेवणार्‍या वसीम मुश्ताक पटवे याला अटक करण्यात आली. संशयीताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर सुभाष चौकात दगडफेक करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गणेश पंढरीनाथ सोलंकी यासह अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.