अमळनेरात अजूनही बर्‍याच बँकाचे एटीएम मशीन बंदावस्थेत

0

अमळनेर । 8 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयाच्या नोटा चालनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून शहरातील बर्‍याच बँकांचे एटीएम मशीन अजूनही बंद आहेत. त्यामुळे पैशे काढण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. चालनातून 500 व 1000 रुपयाच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यावर सर्वच बँकांचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यातच सर्वच बँकांनी आपले एटीएम मशीन बंद ठेवले होते. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून एटीएममधून एका दिवसाला प्रत्येकी 2 हजार तर नंतर 10 तर आता 24 हजार रुपये काढता येवु शकतात. दोन महिन्यानंतर आता परिस्थिती पूर्वरत होत असली तरी पाहिजे तेवढे पैशे अजूनही नागरिकांना आपल्या खात्यातून काढता येत नाही. तसेच बैकेत पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत अजूनही उभे रहावे लागत आहे.

बँकांनाही वरूनच रक्कम मिळण्यास अडचणी येत असल्याची माहिती

24 बाय 7 ऑल टाईम मनी उपलब्ध असल्याचा नारा देणार्‍या एटीएम मशीनला चक्क कुलूप ठोकलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तासनतास बँकेत रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांतून संतापाची भावना व्यक्त होत आहे. बँकांनाही वरूनच रक्कम मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे बँकांचाही एटीएम सारखी परिस्थिती झालेली आहे. मात्र ही परिस्थिती नागरिकांच्या लक्षात येऊ नये, म्हणून तांत्रिक अडचणी मुळे बँक बंद असा बोर्ड बँकेबाहेर लावून बँक बंद ठेवत बँक कर्मचारी जबाबदारीतून मोकळे होतांना दिसून येत आहेत. अद्यापही बँकेने एटीएम सेवा पूर्वरत सुरु न केल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे बँकेची नेमकी परिस्थिती काय आहे व एटीएम मशीन कश्यामुळे बंद ठेवण्यात आले आहेत हे मात्र कळू शकले नाही.

दोन महिन्यापासून एटीएम बंद

भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, बडोदा बँक, युनियन बँक, महाराष्ट्र बँक, देना बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, शिरपूर पीपल बँक, जळगाव जनता बँक व जिल्हा बँक अश्या विविध बँकांच्या मुख्य शाखा शहरात उपलब्ध आहे. त्यात फक्त जिल्हा बँकेचे एटीएम सुविधा उपलब्ध नाही. मात्र इतर बँकांचे एटीएम सुविधा उपलब्ध असल्यावर देखील देना बँक, आय सीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, बडोदा बँक, या बँकांचे एटीएम मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत असल्याचे दिसून येते आहेत तर स्टेट बँकेचे एटीएम मशीन केव्हाही बंद होते आणि केव्हाही चालू केले जाते.