अमळनेरातून पसार झालेल्या आरोपीच्या धुळ्यात आवळल्या मुसक्या

अमळनेर : न्यायालयातून कारागृहात नेत असतांना पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सराईत आरोपीने पोलिसांच्या हाता हाताला झटका देऊन पळ काढल्याची घटना शुक्रवारी शहरात घडली होती. या घटनेत राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी हा पसार झाला होता तर त्याच्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री आरोपीच्या धुळ्यातून मुसक्या आवळल्या आहेत.

बसस्थानकावर पोलिसांच्या हातावर दिली तुरी
राजेश धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना शुक्रवार, 24 जून रोजी न्यायालयात पोलिस घेऊन आले होते. पोलिस मुख्यालयात कार्यरत रमेश पंढरीनाथ सोनवणे, अनिल बद्रीनाथ पवार, राकेश बारकू काळे, भगवान आनंदराव सूर्यवंशी या चौघा पोलीस कर्मचार्‍यांनी चारही आरोपींना कोर्टात सादर करून नंतर ते पुन्हा जिल्हा कारागृहाकडे बसद्वारे प्रवासासाठी बस स्थानकाकडे निघाले. बस स्थानकावर पोहोचल्यावर आरोपी दादू धोबी याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला. यावेळी अनिल पवार व राकेश काळे यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी दादू धोबी हा पसार होण्यात यशस्वी झाला होता.

धुळ्यातून आवळल्या मुसक्या
अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय बापू साळुंखे, हवालदार सुनील हटकर, नाईक दीपक माळी, नाईक रवींद्र पाटील, कॉन्स्टेबल निलेश मोरे, कॉन्स्टेबल गणेश पाटील, चालक कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या पथकाने धुळ्याजवळील फागणे येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी सुरत येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच ही कारवाई करण्यात आली.