अभिजात मराठीसाठी पाठपुरावा करणार

0

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्तीशः पाठपुरावा करणार आहोत, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिले.

सातारा जिल्ह्यातील भिलार येथे देशातल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उदघाटन मुख्यमंत्र्यंच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यांतर साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अभिजात मराठीच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्‍वासन दिले, असे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

प्रा. जोशी, मसापच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे व माजी आमदार कांताताई नलावडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. पंतप्रधान कार्यालयाने कार्यवाहीबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला कळवले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कंवरजित सिंग यांनीही पत्र पाठवले असून, त्यात मद्रास उच्च न्यायालयात याबाबत असलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. त्यामुळे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यवाही सुरु केल्याचे कळवले आहे. मुख्यमंत्री म्हणून आपण प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शिष्टमंडळने केली असून, त्याबाबतचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले.

मर्ढेकरांच्या भूमीत कवितेचे गाव
कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांची जन्मभूमी असलेल्या सातारा तालुक्यातील मर्ढे या गावी भिलारप्रमाणेच कवितेचे गाव संकल्पना राबवावी, अशी मागणीही मसापच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. आपण याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा. आपण याबाबत सकारात्मक कार्यवाही करु, असे त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

न्यायालयातील प्रश्न निकाली निघाल्यामुळे अभिजात मराठीसंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. मी स्वतः पंतप्रधानाशी बोलून व्यक्तीशः याचा पाठपुरावा करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत लवकरच निर्णय व्हावा, यासाठी मी प्रयत्न करेन.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री