अभिजात मराठीसाठी आता भिलारला आंदोलन

0

पुणे: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी वर्षा बंगल्यासमोर करण्यात येणार्‍या धरणे आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता भिलार (ता. महाबळेश्वर) येथे 4 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात महाराष्ट्रातील साहित्यिक, कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे ठोस आश्वासन न दिल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिला आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून ठोस प्रयत्न करावेत आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, यासाठी 25 मार्च आणि 18 एप्रिलला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विनंती कुलकर्णी यांनी केली होती. या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र दिनीच वर्षा निवासस्थानी धरणे आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णयही सातारा शाखेने घेतला होता.

सातारा पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली. त्याबाबतचे पत्रही कुलर्णी यांना 26 एप्रिलला दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असे आंदोलन करता येणार नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखण्यासाठी हे आंदेलन मागे घेण्याचा निर्णय कुलकर्णी व सातारा शाखा यांनी घेतला. आता महाराष्ट्र साहित्य परिषदे आणि राज्यातील साहित्यिक व साहित्यिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी भिलारला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भिलारला उभारलेल्या पुस्तकाच्या गावाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 4 मे रोजी होणार आहे. तेथेच हे आंदोेलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.