अप्रत्यक्ष विषपेरणी

0

काल उत्तरप्रदेशातील शेवटची मतदानाची सातवी फ़ेरी पार पडली. त्यामुळे पाच विधानसभा निवडण्य़ाची प्रक्रीया पुर्ण झालेली आहे. मात्र त्यात कोणाला मतदाराने कौल दिला आहे, त्याचा खुलासा व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेत. येत्या शनिवारी मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतरच कोण जिंकला वा कोणाला जनतेने नकार दिला, ते स्पष्ट होईल. यात अर्थातच उत्तरप्रदेशला अधिक महत्व आहे. कारण तिथून संसदेच्या ८० जागा निवडल्या जातात आणि तेच देशातील सर्वात मोठे राज्य आहे. यात नोटाबंदी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावणेतीन वर्षाच्या कारभारावरही मतप्रदर्शन होणार आहे. त्याचवेळी त्या प्रदेशात पाच वर्षे राज्य केलेल्या समाजवादी पक्षालाही लोकांचा कौल मिळणार आहे. मागल्या खेपेस मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची सत्ता हिसकावून घेत जनतेने समाजवादी पक्षाला कौल दिला होता. आता तोच निर्णय बरोबर होता असे लोक सांगतात, की ती चुक मतदार सुधारतो, हे शनिवारी कळेल. पण त्यात उतरलेल्या तिनही प्रमुख पक्षांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशीची जागा कायम राखून उत्तरप्रदेशला आपले गृहराज्य बनवलेले आहे. म्हणूनच त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर समाजवादी पक्षाला सत्ता टिकवण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे. कॉग्रेसने अर्ध्या लढाईतच पराभव मान्य करून, समाजवादी पक्षाशी निवडणूकपुर्व आघाडी केली आहे. मात्र अस्तित्वाचा लढा आहे तो मायावतींचा! कारण लोकसभेत त्यांना ८० पैकी एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळेच संसदेत त्यांचे अस्तित्व राज्यसभेपुरते मर्यादित होऊन गेलेले आहे. त्यांना लगेच बहूमत व सत्ता मिळण्याची अपेक्षा असणार नाही. पण निदान आपला पक्ष आजही कालबाह्य झालेला नाही, इतकेच सिद्ध करण्याची धडपड करावी लागते आहे. म्हणूनच त्यांनी सोशल इंजिनीयरींग नव्याने केलेले आहे.

गेल्या लोकसभा मतदानात मायावतींचा उच्चवर्णिय मतदार दुरावलाच. पण अपना दलाच्या रुपाने जातव वगळता अन्य दलित मतदारही त्यांना सोडून भाजपाकडे गेला. त्यामुळेच बसपाला लोकसभेत मोठा फ़टका बसला. तरी त्यांना मिळालेली मते लक्षणिय होती. म्हणूनच आपले विधानसभेतील व उत्तरप्रदेशातील अस्तित्व नजरेत भरावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी मायावतींनी घटणार्‍या मतांची संख्या भरून काढण्यासाठी यावेळी मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी दिलेली आहे. वास्तविक या राज्यात समाजवादी पक्ष हा यादव व मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्या समाजवादी पक्षानेही जितक्या मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही, त्यापेक्षा अधिक जागा मायावतींनी दिलेल्या आहेत. त्यातून आपणच मुस्लिमांचे खरे प्रतिनिधीत्व करतो आणि त्यांना न्याय देऊ इच्छितो; असेच मायावतींना दाखवायचे आहे. म्हणूनच त्यांनी नुसत्या अधिक उमेदवार्‍या मुस्लिमांना दिलेल्या नाहीत, तर थेट आपल्या भाषणातूनही आपणच मुस्लिमांचे कैवारी असल्याची खुलेआम जाहिरात केलेली आहे. समाजवादी पक्षाला मत म्हणजे भाजपाला मत; असाच प्रचार मायावतींनी कशाला केला असावा? तर अधिक मुस्लिम उमेदवार असल्याने आपल्याला बहुतांश मुस्लिम मते देणार आहेत. त्यातला जो समाजवादी पक्षाकडे वळेल, तो मुस्लिम मतांची विभागणी करील. सहाजिकच मुस्लिम मतविभागणीचा लाभ भाजपाला मिळू शकतो, असे मायावतींना सुचवायचे आहे. त्याचा साधासरळ अर्थ असा, की भाजपाच्या विरोधात मुस्लिमांनी असले पाहिजे आणि भाजपाला पाडण्यासाठी बसपालाच मते दिली पाहिजेत. अन्यथा भाजपा निवडून येईल व सत्तेतही येईल. त्या प्रचाराचा सरळ सुर असा आहे, की मुस्लिमांनी भाजपाला पाडले पाहिजे आणि तेच मुस्लिमाचे खरेखुरे कर्तव्य आहे. याला विषपेरणी म्हणायचे नाहीतर काय?

एका बाजूला मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी द्यायची आणि पुन्हा मुस्लिमांना भाजपाने एकही उमेदवारी दिली नाही, अशीही तक्रार करायची असा दुटप्पीपणा मायावती व अन्य पक्षांनी केला आहे. जर मुस्लिमांनी भाजपाला मतेच द्यायची नाही असा दावा आहे, तर मुस्लिमांना भाजपाने उमेदवारी तरी कशाला दिली पाहिजे? जो समाज भाजपाला मतेही देत नाही वा त्याने देऊच नये असा आग्रह आहे, त्याच समाजाला भाजपाने उमेदवारी देण्याचा आग्रह तरी कशाला? थोडक्यात सेक्युलर पक्ष भाजपाच्या हिंदूत्वाचा इतका बागुलबुवा करून ठेवतात, की त्यातून मुस्लिम भाजपापासून दुरावला पाहिजे. ह्यातून एक अनाहूत संदेश मुस्लिमांना पाठवला जात असतो, की हिंदूंपासून तुम्हाला धोका आहे आणि म्हणूनच पर्यायाने भाजपा निवडून येण्यात धोका आहे. चटकन त्यातला खरा धोका लक्षात येऊ शकत नाही. सातत्याने असे काही मुस्लिमांच्या कानावर पडत राहिले, मग त्यांनाही तसेच वाटू लागते आणि हिंदू मुस्लिम दुरावा वाढत जातो. आज देशाच्या अनेक भागात इसिस वा तोयवांच्या नादाला मुस्लिम तरूण लागत असतात. त्यांच्या मनाची पहिली मशागत अशा अपप्रचारातून सुरू होत असते. मुस्लिम मतांचे गठ्ठे मिळवण्याच्या हव्यासातून मुस्लिम तरूण वर्गाला मुख्यप्रवाहातून बाहेर ढकलण्याचे पाप मायावती वा मुलायमसारखे लोक करत असतात. ही संथगतीने होणारी विषपेरणीच समाजात बेबनाव निर्माण करते आणि त्यातून मग कोणी इस्लाम वाचवण्यासाठी झाकीर नाईकच्या आहारी जातो. कोणी पुढे तोयबा वा इसिसचा पाठीराखा होऊन दहशतवादाकडे वळत असतो. समाजवादी पक्षाची सत्ता असतानाही मुझफ़राबाद येथील दंगा झाला आणि त्याचे दुष्परिणाम मुस्लिमांनाच अधिक भोगावे लागले आहेत. म्हणजेच भाजपा सत्तेत असला वा नसला, म्हणून मुस्लिमांसाठी दंगलीचा धोका संपत नाही, इतके सरळ साधे वास्तव आहे.

ज्या काळात भाजपाचे लोकसभेतील प्रतिनिधीत्व नगण्य होते, तेव्हाही यापेक्षा भीषण दंगली झालेल्या आहेत. अगदी गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना जी दंगल माजली, त्यापेक्षा अधिक भयंकर दंगली तिथे कॉग्रेसचे सरकार असताना झालेल्या होत्या. तितकेच नाही, कॉग्रेसची सत्ता गुजरातमध्ये असताना महिनोन महिने राज्यात अनेक शहरात संचारबंदी लागलेली असायची. उलट मोदींच्या कारकिर्दीत गुजरातमधील दंगलींना कायमचा विराम मिळालेला आहे. मोदींच्या बारा वर्षाच्या कालखंडात गुजरातमध्ये जवळपास गुजरात दंगलमुक्त होऊन गेला, म्हटल्यास वावगे ठरू नये. पण ती वस्तुस्थिती लपवून २००२ च्या दंगलीवरून सतत काहुर माजवले गेलेले आहे. आताही जिथे भाजपाची सत्ता आहे, अशा राज्यात कुठेही हिंदू-मुस्लिम दंगली होत नसतील, इतक्या दंगली तथाकथित पुरोगामी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात होत असतात. ममता बानर्जींच्या बंगाल वा मार्क्सवादी पक्षाच्या केरळ राज्यात त्याचे दाखले आहेत. मग मायावतींनी उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी चालवलेली धडपड केविलवाणी नाही काय? त्यातून मुस्लिम मतांची विभागणी टाळली जाणे शक्य नाही. किंवा त्याचा भाजपाला होणारा लाभ कमी होण्याचीही शक्यता नाही. उलट अशा प्रचारामुळे जिथे मुस्लिम संख्या अधिक आहे, अशा जागी हिंदूंच्या मतांचे धृवीकरण होऊन भाजपाला अधिक फ़ायदाच होतो. बहूधा म्हणूनच भाजप कृतीने आपला हिंदूत्ववाद पुढे रेटत असत्तो. आपण मुस्लिमांना मते उमेदवारी देत नाही, कारण आपण मुस्लिम मतांसाठी लाचार नाही, असे उघडपणे न बोलताही भाजपा सिद्ध करतो. परिणामी न बोलताही भाजपा हिंदूंचा एकमेव पक्ष ठरून, त्याला त्या भावनेतून अधिक मते मात्र मिळू शकतात. आताही मायावतींनी अशाच उक्ती कृतीतून भाजपाला मोठी मदत केली आहे. शनिवारी निकालातून त्याची प्रचिती आल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. मात्र यातून होणारी विषपेरणी मुस्लिम तरूणांना भरकटून टाकते, ते दुर्दैवी आहे.