अपयशालाच पालक लागतो!

0

गुरुवारी 23 तारखेला एकाचवेळी महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यावेळी सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निकालावर लागले होते. शेवटी जो लागायचा तो निकाल एकदाचा लागला. निवडणूक कोणतीही असो निकाल एकटा कधी येत नसतो, तो आपल्यासोबत असंख्य प्रश्‍नांची मालिका आणतो. विजयाच्या माळा ज्यांच्या गळ्यात पडल्या ते पुढच्या उपाययोजना, खटपटी करण्यात मश्गुल होतात आणि पराभव झालेले उमेदवार अन् जवळचे कार्यकर्ते मात्र असंख्य प्रश्‍नांच्या गुंत्यात असे काही स्वतःला फसवून घेतात की, त्यातून सहीसलामत निघणे कठीण होते. त्यातील काहींवर 6 महिन्यांनी मानसोपचार करावे लागतात, काहीजण तत्काळ कुणाची तरी डोकी फोडून रागाला वाट मोकळी करून देतात तर काही अनेकांचे कायमचे शत्रू म्हणून पुढे आयुष्यभर वावरताना दिसतात. राजकारणातला खूनशी प्रवास कदाचित याच अपयशाची देणगी असावा, असे म्हणायला भरपूर वाव आहे. ही निवडणूकही त्याला अपवाद म्हणता येणार नाही.

निकालाचे सगळे आकडे समोर आल्यावर लोकांची पहिली प्रतिक्रिया असते असे झालेच कसे? हे सगळे धक्कादायक आहे! काहीतरी दगाफटका झाला… निवडून येणार्‍या पक्षाचे जे भक्त, चाहते असतात ते म्हणतात आमची लाट होती, असेच होणार होते… तरीही अपेक्षित जागा आल्या नाहीत आणि ज्यांना प्रत्यक्ष निवडणूक कशाशी खातात हे कळत नाही अन् विजयाचे विश्‍लेषण पण जमत नाही त्यांचे एक वाक्य हमखास असते, ईव्हीएम मशीन… कुछ तो गडबड है! सध्या आपण सगळे याच अवस्थेतून जात आहोत. निवडणूक शहरी असो व ग्रामीण भावना सर्वत्र याच आशयाच्या व्यक्त होताना दिसत आहेत. बरं जो जिंकतो त्याला यापैकी काहीच करण्याची गरज पडत नाही. त्याच्या चिंता वेगळ्या असतात. बेताची आर्थिक परिस्थिती असेल तर उधारी कशी फेडावी आणि गडगंज असेल तर झालेला खर्च व्याजासह कसा वसूल करता येईल? याचे नियोजन त्यांच्या डोक्यात चाललेले असते.

निवडणुकीत जय पराजय होतच असतो हे सगळेच बोलत असतात. परंतु, ज्याच्या वाट्याला पराजय येतो ना, तो अतिशय नैराश्येत शिरलेला असतो. भरचौकात जणू कुणी दवंडी पिटवून आपले नाक कापून नेल्याचा फील त्याला येत असतो. विविध राजकीय पक्षांत जय आणि पराजय पचवणारे फार कमी लोक आढळतात. पराजय जसा पचवायचा असतो तसाच जयसुद्धा पचवावा लागतो. त्याची सवय करावी लागते हे मोजक्या लोकांना माहीत असते आणि ज्यांनी त्याची सवय लावून घेतली त्यांना राजकीय जीवनात सहजतेने वावरता येते हे आपणही अनुभवले असेलच. निकाल मुळात अनपेक्षित वगैरे नसतात. फक्त आपण बहुसंख्य लोक प्रत्यक्ष त्या प्रक्रियेत सहभागी नसतो. आपला संबंध केवळ निकालापुरता येतो आणि कधीतरी पानटपरी किंवा मित्रांच्या गप्पामधून निवडणूक कानावर पडलेली असते. अहोरात्र त्याच कामाला झोकून देणारी जी मूठभर माणसं असतात त्यापैकी मुरलेल्या, तटस्थ लोकांना निकालाचा अदमास आलेला असतो.

या निवडणुकीत ज्यांच्या वाट्याला जबरदस्त यश आले, त्या भाजप-सेनेचे त्यासाठी किती टाके तुटले हे समजून घ्यायचे असेल, तर नक्कीच पडद्यामागील एखाद्या सूत्रधाराला गाठा म्हणजे कळेल. विजयाचे अनेक बाप असतात आणि पराभवाला शोधूनही पालक मिळत नाही, असे म्हटले जाते यात तथ्य नक्कीच आहे. यश डोक्यात जाते आणि अपयश जिव्हारी लागते, सार्वजनिक जीवनात हे दोन्ही दुर्गुण समजले जातात, ज्याला दीर्घकाळ टिकायचे आहे त्याने यश आणि अपयशाची जागा बदलली पाहिजे, यश हृदयात तर अपयश मेंदूत साठवले पाहिजे. मेंदूमध्ये साठवलेली गोष्ट चिंतनाला, विचार करायला बाध्य करते आणि हृदयातली गोष्ट भावनांनी व्यक्त व्हायला सांगते. आपण निवडलेला प्रतिनिधी भावनांनी व्यक्त व्हायला लागला तर तो चिरकाल स्मरणात राहतो. स्वतःच्या चुका न दिसता भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती जणू आपल्या विरोधकाला जाऊन भेटलेला आहे या कैफात उर्वरित काळातही पराभूत व्यक्ती माणसे तोडत जातो म्हणून पराभवाची कारणमीमांसा करण्याची गरज असते.

इष्टापत्ती हा शब्द आपण नेहमी ऐकतो. पण, त्याचा अर्थ कमी लोकांना कळतो, एखादी आपत्ती, संकट, वाईट घटनासुद्धा आपल्यासाठी इष्ट, चांगली किंवा संधी असू शकते. पराभव ही काही चांगली घटना नसते. परंतु, त्यातून खूपकाही शिकायला मिळू शकते. जो शिकतो तो पुढे उत्तम राजकीय नेता होण्यास पात्र ठरतो. यशवंतराव चव्हाण अपयशाला योग्य गुरू असे म्हणत असत, सत्तेच्या परिघात वावरणार्‍या प्रत्येकाने या गुरूचे शिष्यत्व स्वीकारले पाहिजे. ज्या व्यक्ती पक्ष, संघटना पराभवातून शिकत जातात त्यांचे भविष्य उज्ज्वल असते, असेही म्हणावे लागत नाही. कारण ते कृतीतून दाखवून देतात. मात्र, जे काहीच शिकत नाहीत त्यांचा राज ठाकरे होतो, हे समजून घेण्यासाठी कुण्या जोतिष्याकडे जाण्याची गरज नसते. विदर्भात अमरावती महापालिकेत एमआयएम 10 जागा घेते आणि अकोल्यात 2 घेऊन 4 जागी निसटता पराभव स्वीकारते. सोलापुरात 9 जागा आणि मुंबईतही खाते खोलते. याचे अर्थ लावणेसुद्धा पराभवाच्या चिंतनात अनेकदा दडलेले असतात.

राहिला प्रश्‍न ईव्हीएम मशीनचा, तर हे सगळे पराभूत मानसिकतेचे आरोप म्हणायला हरकत नाही. समजा मुंबईत सत्ताधारी भाजपला विजय आपल्या बाजूला वळवायचा असता तर सेनेला 84 पर्यंत त्यांनी कशाला जाऊ दिले असते? ठाण्यात सेनेची एकहाती सत्ता कशी आली असती? खुद्द दिल्लीत मोदींच्या नाकावर टिच्चून आम आदमी पक्ष कसा उगवला असता? ग्रामीण भागात अनेक जिल्हापरिषदा इतर पक्षांच्या ताब्यात कशा गेल्या असत्या? या बाजूनेही विचार कारण्याची गरज आहे. पण, एखाद्याचा टोकाचा विरोध आणि त्यात पराजित मानसिकता दुसर्‍या बाजूचा विचारच करू देत नाही हे लक्षात घ्यायला हवे. मशीनचा घोटाळा झाला हे म्हणणे खूप सोपे असते. परंतु, आपले नियोजन, संपर्क, व्यवहार, सातत्य यामध्ये काय घोटाळा केला? याकडे बघण्याचे धाडस होत नाही. म्हणूनच अपयशाला पालक सापडत नसतात, ते निराधार बनते. आपणच का होऊ नये
त्याचे पालक?

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248