अपघात कमी करण्याची जबाबदारी सर्वांची

0

धुळे : रस्तावरचे अपघात कधी घडतील याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना अपघात म्हणतात. अपघात कमी करण्याची जबाबदारी केवळ एका विभागाची नाही, तर ती सर्वांचीच आहे. नागरिकांनी एकमेकांचा सन्मान केला, तर वाहतुकीला शिस्त लागू शकते. रस्ता सुरक्षा अभियान तुमच्या आमच्यासाठीच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे शहर पोलिस, धुळे ग्रामीण पोलिस, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 28 व्या रस्ता सुरक्षा अभियान- 2017 चे उदघाटनावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस., प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे, ध्रुव मोटर्सचे संचालक आशिष पाटील व्यासपीठावर होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा विषयक माहिती देणाऱ्या विविध माहिती पत्रकांचे अनावरण करण्यात आले. तसेच गेल्या वर्षी रस्ता अपघातातून चौघा विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका करणारे शिक्षक जी. के. ठोंबरे यांचाही सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती द्या
जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले, पाश्चात्य देशात वाहतुकीला शिस्त आहे. ही शिस्त तेथील नागरिकांनी लावून घेतली. आपणही वाहतुकीचे नियम समजून घेत शिस्त लावून घेतली पाहिजे. लेन कटिंग न करणे, सिग्नल न तोडणे, पादचाऱ्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिकांनी एकमेकांचा सन्मान करुन सहकार्य केले, तर वाहतुकीला आपोआप शिस्त लागेल. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली पाहिजे. या नियमांचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. रस्त्यावर वाहन चालविताना निष्काळजीपणा दाखविला, तर तो स्वत:च्या जीवाबरोबरच दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतो. आगामी काळात रस्त्यांचे जाळे वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क, जागरूक राहत वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षितेसाठी रस्त्यावर वाहन नेण्यापूर्वी चालकांनी वाहन, ब्रेक, टायरची तपासणी केली पाहिजे, असेही पांढरपट्टे यांनी नमूद केले.

वाहनांची तपासणी मोहीम राबविणार
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे, असे पोलिस अधीक्षक चैतन्या यांनी सांगितले. ते म्हणाले, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. याबाबत नागरिक व समाजाने स्वयंप्रेरणेने या नियमांचे पालन केले पाहिजे. सर्वसामान्य जनतेत जनजागृतीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. चालकांनी मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये. वाहतुकीच्या नियमांच्या पालनात आपण यशस्वी झालो, तर समाज सुरक्षित राहील. लहान- लहान गोष्टींच्या अनुकरणातूनही रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन होवू शकते, असेही त्यांनी नमूद केले. मोरे म्हणाले, दुचाकी वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये. प्रवास करताना हेल्मेट घालावे. आगामी काळात शाळा- शाळांमध्ये जावून वाहतूक नियमांची माहिती देण्यात येईल. तसेच वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, विकसनशील देशांत अपघाताचे प्रमाण अधिक आहे. देशात दर 4 मिनिटाला एकाचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. अतिवेगाने वाहने चालविणे, निष्काळजीपणाने वाहने चालविणे, रस्त्यांची दुरवस्था, मद्यप्राशन करुन वाहने चालविण्यामुळे अपघात होतात. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. श्री. राऊत यांनी प्रास्ताविक केले. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. जाधव यांनी आभार मानले. यावेळी परिवहन, पोलिस विभागासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.