अपघातातील मयताच्या कुटुंबाला 50 हजाराची मदत

0

शहादा: येथील तालुका एज्युकेशन सोसायटीचा कर्मचारी व मनरद येथील रहिवासी दीपक भामरे यांचे अपघाती निधन झाल्याने भामरे कुटुंबियास संस्थेचे चेअरमन तथा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्याकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
येथील तालुका एज्युकेशनल अँड को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित सीनियर आर्टस् महिला महाविद्यालयातील शिपाई या पदावर कार्यरत असलेला दीपक साहेबराव भामरे (वय 26, रा. मनरद, ता. शहादा) याचा रविवारी दोंडाईचे येथे अपघात झाला. त्यात त्याचे निधन झाले. मयत दीपक भामरे यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व दयनीय आहे. त्याच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी, यासाठी संस्थेचे चेअरमन तथा शहराचे नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील यांनी संस्थेच्यावतीने मयताच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन करुन 50 हजारांची आर्थिक मदत केली. संबंधित परिवारास आर्थिक मदत मिळावी म्हणून संस्थेचे व्हा. चेअरमन हिरालाल पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत पाटील, विश्राम काका शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदविला.