अपघातांमध्ये जळगाव जिल्हा राज्यात सहावा

0

जळगाव: जळगाव शहरासह जिल्हाभरात होणार्‍या वाढत्या अपघातांवर चर्चा सुरू असतांनाच अपघातांमध्ये जळगाव जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी आज रस्ताशक्ती समितीच्या बैठकीत दिली. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत खा. रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.

खासदारांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या रस्ता शक्ति समितीची बैठक खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांची माहिती

बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी जिल्ह्यात झालेल्या अपघातांची माहिती दिली. लोही यांनी सांगितले की, मागील पाच महिन्यात पारोळा, मेहुणबारे, जळगाव ते धुळे या क्षेत्रात अपघातांचे प्रमाण सर्वाधिक राहीले आहे. गत वर्षात 422 अपघात झाले होते. त्यात आता आठ टक्क्यांनी वाढ झाली असुन यंदा 454 जीवघेणे अपघात झाले आहेत. यात दुचाकीधारक यांचीच संख्या अधिक आहे. अपघातात राज्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सहावा क्रमांक असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी दिली. त्यावर खासदार रक्षा खडसे आणि खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब खेदजनक आहे. रस्ता सुरक्षेचे मोठ्या प्रमाणावर काम होऊनही नागरिकांमध्ये जनजागृती का होत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच कुठल्याही परिस्थीतीत अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतुक शाखेला दिल्या.

Copy