अन्न औषध प्रशासन अधिकार्‍यांची मंत्र्यांकडे तक्रार

रेमडेसिव्हीरचा अधिकार्‍यांकडूनच काळाबाजार - योेगेश देसले

जळगाव – जिल्ह्यात कोविड रूग्णांना देण्यात येणार्‍या रेमडेसिव्हीरचा अधिकार्‍यांकडुनच काळाबाजार होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे केली आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रूग्णांना उपचारासाठी डॉक्टरांकडुन देण्यात येणार्‍या रेमडेसिव्हीरच्या इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यासाठी प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अखत्यारीत इंजेक्शन वाटपाची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अनिल माणिकराव यांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे. या समन्वयकांकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरवठा करण्याचे नियोजन देण्यात आले आहे. मात्र रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना संपर्क साधल्यास साधा फोन देखिल ते घेत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांनी आज भ्रमणध्वनीद्वारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.
राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी देसले यांनी अनिल माणिकराव यांना वारंवार फोन करूनही ते फोन घेत नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते मोठ्या अपेक्षेने आमच्याकडे येतात. मात्र अनिल माणिकराव यांच्याकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. तसेच जिल्ह्यातील काही फार्मा डिस्ट्रीब्युटरकडे ते जाऊन बसतात. जिल्ह्यात रेमडेसिव्हीरचा जो काळाबाजार सुरू आहे तो त्यांच्याच आशीर्वादाने सुरू असुन त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणीही योगेश देसले यांनी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. त्यावर ना. शिंगणे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.