अनोळखी इसमाच्या मृतदेहासाठी पोलिसांची कसरत

0

असोदा रेल्वेगेटजवळील घटना
अग्निशमन विभागाच्या मदतीने बाहेर काढला मृतदेह
जळगाव- शहरातील असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या पुलाखालील नाल्याच्या पाईपात सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. दुर्गंधी सुटल्याने प्रकार लक्षात आला. दरम्यान या मृतदेहाला पाईपाबाहेर काढण्यासाठी शनिपेठ पोलिसांची चांगलीच कसरत झाली. अग्निशमन विभागाच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाईपाबाहेर काढण्यात आला. असोदा रेल्वेगेटजवळ रस्त्याला लागून भरत चंपालाल दरटेकर रा. हरिओमनगर यांची पानटपरी आहे. गुरुवारी सकाळी असोदा रेल्वेगेटपरिसरात दुर्गंधी सुटली. दरटेकर या तरुणाने याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, पीएसआय खेमचंद परदेशी, एएसआय करीम शेख, गिरीश पाटील, अशोक पवार, प्रशांत देशमुख, अभिजीत सैंदाणे हे घटनास्थळी रवाना झाले. याठिकाणी शोध मोहिम राबविली असता रेल्वेगेटजवळ रस्त्याच्या खालून गेलेल्या नाल्याच्या पाईपमध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आले. परिसरात काही दिवसांपासून नग्न अवस्थेत फिरत असलेल्या वेडसर इसमाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Copy