अनेकांच्या पिढ्या संपल्या शिवसेना नाही !

0

मुंबई । अनेकांच्या पिढ्या संपल्या तरी शिवसेना संपली नाही असे ठणकावून सांगत आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीतल्या प्रचारातील पहिल्या सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भविष्यात युतीसाठी आपण हात पुढे करणार नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवरवर चौफेर टिकास्त्र सोडले. मुंबईचा विकास हा अन्य महापालिकांपेक्षा जास्त पारदर्शक असून आम्ही विकासाचा वचननामा घेऊन मुंबईकरांचा कौल मागत असल्याचे प्रतिपादनही ठाकरे यांनी केले.

आक्रमक पवित्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे आज काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आणि अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 21 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. यात भाजप व शिवसेना स्वबळावर लढणार आहे. तर भाजपने रिपब्लिकन पक्ष, रासप आणि शिवसंग्राम या घटकपक्षांना सोबत घेतले आहे. शिवसेनेने निवडणुकीत 227 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजपनेही 195 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर रिपब्लिकन पक्षासह इतर मित्रपक्षांना 34 जागा सोडल्या आहेत. खरं तर निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य पक्ष व अपक्षही असले तरी खरा ‘सामना’ शिवसेना व भाजपमध्ये होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याचीच चुणूक ठाकरे यांच्या आजच्या भाषणातून दिसून आली.

मुंबई सेनेचीच

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबई ही शिवसेनेचीच असून भाजपाची नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, अनेकांच्या पिढ्या संपल्या तरी शिवसेना संपली नाही. ‘एकही भूल कमल का फुल’ असा टोला मात आता ही ‘भूल’ दुरूस्त करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे ते म्हणाले. नव्वदच्या दशकात मुंबईत आलेल्यांनी आपल्याला धडा शिकवू नये असेही ते म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही त्यांनी टिकास्त्र सोडले. परिवर्तन, परिक्रमा व पारदर्शक अशी जोडाक्षरे वापरून मुख्यमंत्री स्वत:ला बुध्दीमान समजत असल्याचा टोला त्यांनी मारला. ते काम सोडून प्रचारात व्यस्त असून भाजपकडे दुसरा चेहरा नसल्याचे ठाकरे म्हणाले.

पीककर्ज माफी हवी

गेल्या तीन चार वर्षात नापिकी आणि निसर्गाच्या फटक्याने जेरीस आलेल्या शेतकर्‍याला यावर्षी चांगला हंगाम आला तर केंद्र सरकारने नोटबंदीचा जाचक निर्णय घेऊन यावर पाणी फेरले. यामुळे गरीब माणूस भरडला गेला. युपीत भाजपने सत्तेत आल्यावर पीक कर्ज माफ करण्याचे सांगितले आहे. महाराष्टातही शेतकरी जेरीस आलेले असल्यामुळे येथेही कर्जमाफी हवी अशी मागणी त्यांनी केली.

आम्हीच पारदर्शक

मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकतेवरून शिवसेनेवर टीका केल्यानंतर आज उध्दव ठाकरे यांनी याच मुद्यावरून त्यांच्यावर हल्ला चढविला. देशातील अनेक महानगरांमध्ये पावसाळ्यात अडचणी आल्या असतांना मुंबईत मात्र त्रास झाला नाही. कारण आम्ही कामे केली आहेत. यातच केंद्र सरकारच्या अहवालाने मुंबई महापालिकेच्या पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारावर शिक्कामोर्तब केले असल्याचे त्यांनी नमुद केले. मात्र शिवसेनेचा द्वेष करणार्‍यांना हे दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप हा पक्ष भगव्याचा अपमान करत असून त्यांनी या पवित्र झेंड्याचा एक भाग कापून टाकल्याबद्दलही त्यांनी टीका केली. शिवस्मारक आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या वर्क ऑर्डर नसूनही पंतप्रधानांची याचे भूमिपूजन/जलपूजन केल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडविली.

श्रीपाल सबनिसांचे अभिनंदन

डोंबिवली येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात काल मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या पवित्र्यावर जाहीरपणे कान उघडणी केल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून थेट माजी संमेलनाध्यक्षाने असे म्हणण्याचे धाडस दाखविल्यामुळे आपण त्यांचे जाहीर कौतुक करतो असे ते म्हणाले.

बेघर करून विकास नाही

भाजपने विस्तारीत मेट्रोचे आश्‍वासन दिले असले तरी यामुळे अनेक जण विस्थापीत होणार आहेत. यामुळे बेघर करून झालेल्या विकासाला शिवसेनेचा विरोध राहील असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला. विस्थापीत होणार्‍यांना नेमकी घरे कुठे मिळणार ? हे नकाशात दर्शविल्याशिवाय शिवसेना मेट्रो होऊ देणार नसल्याचा इशारादेखील त्यांनी दिला. तर मुंबईत पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर नागरिकांना मोफत उपचार पुरविण्यात येतील असे ते म्हणाले. शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख अथवा त्यांच्या कुुटुंबियांच्या विरूध्द बोलणार्‍यांना मुंबईकरच संपवितात असा इतिहास असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.