अनुदान प्रक्रियेविरोधात मराठी निर्मात्यांची न्यायालयात धाव

0

मुंबई : मराठी चित्रपटांच्या अनुदान वाटप व्यवस्थेमधील पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत मराठी चित्रपटसृष्टीतील काही निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बरेचसे मराठी चित्रपट अनुदानासाठी पात्र असूनही त्यांना डावलण्यात येत असल्याचे या निर्मात्यांचे म्हणणे आहे. अनुदान प्रक्रियेत पारदर्शकता आणत त्या विभागातील तज्ज्ञ व्यक्तिंनीच त्या त्या विभागातील कामगिरीसाठी गुण द्यावेत अशी या निर्मात्यांची मागणी आहे.

मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांची संख्या वाढली आहे. अनुदानावर नजर ठेवून सुमार दर्जाच्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागल्याने अशा चित्रपटांना आळा घालण्यासाठी सरकारने अनुदानासाठी पात्र चित्रपटांची अ आणि ब अशी वर्गवारी ठरवली आहे. त्या वर्गवारीत येणार्‍या चित्रपटांना त्या पटीत अनुदान दिले जाते, पण ज्या निर्मात्यांच्या चित्रपटांना अनुदान मिळालेले नाही त्यांनी व्यवस्थेवर आक्षेप घेतला असून निवड प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या आधी या निर्मात्यांनी माहितीच्या अधिकाराखाली सर्व माहिती गोळा केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. चित्रपटांना अनुदान देण्याचे काम सुमार पद्धतीने सुरू असल्याची जाणिव त्यांना करून देण्यात आली आहे. कुठेही दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला.

या निर्मात्यांमध्ये सुवर्णा बांदिवडेकर, रोमिल रॉड्रीग्ज, अनुपकुमार पोद्दार, पंकज भट्ट, ऋषिकेश मोरे, नवेंद्र ठाकूर, विशाल तेलंग, अश्‍विनी दरेकर, प्रज्ज्वल शेट्टी, विवेक शाह यांचा समावेश आहे. या सर्व निर्मात्यांनी महाराष्ट्र सरकार, दादासाहेब फाळके चित्रनगरी, सांस्कृतिक व्यवहार संचालनालय आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. ठण ठण गोपाळ, बुगडी माझी सांडली गं, गुरुकुल, धमक, सुपर्ब प्लॅन, प्रेमासाठी कमिंग सून, गोवा 350 किमी., तुझी माझी लव्ह स्टोरी, विशेष म्हणजे ही माझी मिसेस, गोष्ट तिच्या प्रेमाची या चित्रपटांना अनुदान नाकारण्यात आल्याने या चित्रपटांचे निर्माते न्यायालयाची पायरी चढले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे.

आमचा कोणावरही वैयक्तिक रोष नाही. आमचा अनुदान देण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप आहे. आमच्या चित्रपटांना अनुदान मिळाले नाही हा मुद्दा दुय्यम आहे. आमचे चित्रपट अनुदानासाठी पात्र असूनही ते मूळात नीट पाहिलेच गेलेले नाहीत. हा आमचा मुद्दा आहे. अनुदान समितीतील सदस्यांनी आमचे चित्रपट पुन्हा पाहावेत आणि त्या त्या विभागातील तज्ज्ञांनी त्या त्या विभागातील कामाला गुण द्यावेत. उदाहरणार्थ दिग्दर्शनाचे गुण दिग्दर्शकाने, संगीताचे गुण संगीतकाराने, वेशभूषेचे गुण वेशभूषाकाराने द्यावेत ही आमची मागणी आहे.
राजेंद्र बांदिवडेकर, निर्माता-दिग्दर्शक, (सीएस फिल्म्स)