अनुदानाची रक्कम बँकेत जमा करावी

0

फैजपूर : केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यातील 19 मे 2016 पर्यंत झालेल्या ऊस गाळपावर प्रती क्विंटल साडेचार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी साखर कारखान्यांकडून प्रस्ताव मागितले आहे. या अनुषंगाने येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याने उत्पादन अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

साखर संचालक, अन्न व सार्वजनिक विभागास पत्र
या परिपत्रकातील अट क्रमांक 2 व 5 अन्वये ज्या कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी दिलेली नाही अशांना हे अनुदान एफआरपी पूर्ण करण्यासाठीच वापरा, असे परिपत्रकात स्पष्ट नमूद केले असल्याने मधुकर सहकारी साखर कारखान्याने सन 2015-15 या गळीतासाठी एफआरपी प्रती मेट्रीक टन 1841 रुपये असूनसुध्दा आतापर्यंत फक्त 1 हजार 696 रुपये प्रती मेटिकटन ऊस उत्पादकांना दिले आहे. या एफआरपीची उर्वरित रक्कम रुपये 145 प्रती मेट्रिकटन अदा करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतही जोरदार मागणी केली होती. परंतु व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने यावल तालुक्यातील सुमारे 350 ते 400 ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या साखर संचालक, अन्न व सार्वजनिक विभाग नवी दिल्ली यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. निवेदनात मसाका सदर रक्कम ऊस उत्पादकांना देणार नाही, अशी शंका व्यक्त करुन ही रक्कम थेट ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करुन योग्य पाठपुराव्यासाठी निवेदनाच्या प्रती खासदार रक्षा खडसे यांनाही देण्यात आल्या आहे.