अनिल बिलावा ठरले ‘नवोदित मुंबई श्री’चे मानकरी !

0

मुंबई : परळच्या अनिल बिलावाने ‘नवोदित मुंबई श्री’चा किताब पटकावला आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आाणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवोदित मुंबई श्री’चे आयोजन करण्यात आले होते. खुल्या मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. १९५ नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या प्रत्येक गटात ३०-३५ स्पर्धकांनी आपली ताकद दाखवली.

प्रत्येक गटात एकाच ताकदीचे ४-५ खेळाडू असल्यामुळे गटविजेता निवडतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. प्रत्येक गटांमध्ये गटविजेत्यासाठी अव्वल दोन-तीन खेळाडूंमध्ये कंपेरिझनही करण्यात आली. इतक्या प्रचंड सहभागाच्या स्पर्धेतून गटविजेत्याची निवड करणे आमच्यासाठी फार आव्हानात्मक असल्याचे गुणलेखक सुनील शेगडे यांनी सांगितले.

स्पर्धेचे सातही गट अत्यंत चुरशीचे झाले. मात्र जेतेपदासाठी जेव्हा हेमंत भंडारी, विपुल सावंत, रूपेश चव्हाण, मकरंद दहिबावकर, अनिल बिलावा, राजेश खाटीकमोट आणि विकास म्हापसेकर हे सातही खेळाडू उतरले तेव्हा 75 किलो वजनीगटाच्या गटविजेत्या अनिल बिलावासमोर सारेच फिके पडले. या नवोदित खेळाडूने साऱ्यांनाच आपल्या प्रेमात पाडले.

Copy